
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील अहिल्याबाई होळकर नगरातील करदात्या नागरिकांसाठी आवश्यक अशा नागरी सुविधांचा मोठ्या
प्रमाणात अभाव आहे तर दुसरीकडे महापालिका प्रशासन मात्र सक्तीने कर वसूली करत असते. परिणामी तेथील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान नागरी सुविधांचा अभाव असलेला हा प्रश्न तात्काळ मार्गी न लावला गेल्यास प्रहार जनशक्तीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा गंभीर इशारा प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी महापालिकेला दिला आहे.
वसमत रोडवरील औद्योगिक वसाहतीपासून कांही अंतरावर सुमारे २५ वर्षांपासून वसलेली अहिल्याबाई होळकर नगर नावाची मोठी वसाहत आहे. त्या वसाहतीमध्ये रहदारीसाठी साधा रस्ता सुध्दा नाही. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर आणि वसाहतीमध्येही कमालीचा चिखल झाला आहे.
मोठ्या प्रमाणात काळी माती व साचलेले पावसाचे भयंकर पाणी यांचे मिश्रण झालेल्या भयंकर चिखलातूनच सदर वसाहतीच्या व सभोवतालच्या सर्व नागरिकांना या भागात रहदारी नाईलाजाने करावी लागते. मुख्य रस्ता चिखलमय आहेच शिवाय आतल्याही सर्व गल्ल्यावरुन सुध्दा घाण सांडपाणी मिश्रीत चिखलातूनच रहदारी करावी लागते.
या वसाहतीमध्ये नाल्या व गटारांची कोणतीही सोय नाही. सुलभ शौचालये आणि स्वच्छता गृहे नाहीत. पुरेशा दिवा-बत्तीची सोय नाही. पिण्याच्या पाण्याची पूर्ती बोंबाबोंब. साफसफाई नाही, कचरा उचलण्यासाठी घंटागाडी कधीच नसते परिणामी तोच कचरा कुजला जावून आरोग्याला निमंत्रण देणा-या घाणीचे साम्राज्य आपोआपच बनले जाते. समाज मंदीराचा अभाव. नागरी वस्त्यांमध्ये ज्या ज्या मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे, अशा कोणत्याही सुविधा महापालिकेच्या वतीने पुरविण्यात आल्या नाहीत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नागरी सुविधांचा अभाव असूनही कराची वसूली महापालिका प्रशासन अगदी सक्तीने वसूल करीत असते हे मुळीच नाकारता येणार नाही.
कर भरणे जसे नागरिकांचे कर्तव्य ठरले जाते तसे सुविधा पुरविण्याचे कर्तव्य शहराचे पालकत्व स्वीकारलेल्या महापालिकेचे ठरत नाही का, हा खरा सवाल आहे. नव्हे ती स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सुमारे २५ वर्षांपूर्वीची ही वसाहत आहे. मतांसाठी हीच राजकीय मंडळी घिरट्या घालतांना सुविधांकडे मात्र जाणीवपूर्वक काना डोळा करीत असतात, हेच क्लेशदायक असल्याचे दिसून येते. आगामी काळात महापालिका येथील नागरिकांना जर सुविधा पुरविणार नसेल तर यापूर्वी नागरिकांनी मनपाला अदा केलेला कर आणि बेटरमेंट चार्ज ही परत घेतला जाईल, असा निर्वाणीचा इशारा देऊन लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल असे प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी सांगितले.