
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे : निकृष्ट कामामुळे आतापर्यंत केवळ तीन कंत्राटदारांनी पुणे महापालिकेला (PMC) 3.72 लाख रुपयांचा दंड भरला आहे. डिफेक्ट लायबिलिटी पीरियड (DLP) दरम्यान रस्त्यांवर खड्डे असतानाही कारवाईला अजून वेग आलेला नाही. 15 प्रभाग कार्यालयांपैकी नऊ वॉर्ड कार्यालयांनी DLP मधील 640 रस्त्यांची यादी पीएमसीला सादर केली आहे. मात्र अजूनही कारवाई केल्याचं चित्र नाही आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. डीएलपीचा कालावधी तीन वर्षांचा असतानाही रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. काही रस्ते चार ते पाच महिन्यांपूर्वीच बांधण्यात आले होते, मात्र आज त्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदांरावर दंड आकारला होता.
डीएलपीमधील 139 रस्ते महापालिकेच्या मुख्य रस्ते विभागांतर्गत असून त्यांची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. एका खड्ड्यासाठी (एक चौरस मीटर) खर्चाच्या तिप्पट म्हणजे पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे असतानाही आतापर्यंत केवळ पाच रस्त्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी तीन कंत्राटदारांनी वसूल केलेला दंड जमा केला आहे.
यामध्ये कात्रज येथील नॅन्सी लेक होम्स लेक टाऊन पद्मजा पार्क रोड एस.एस. कन्स्ट्रक्शनने एक लाख 32 हजार 990 रुपयांचा दंड भरला. गणेश एंटरप्रयझेस कंपनीने देसाई हॉस्पिटल मेन रोडवर खड्डे पडल्याने दोन लाख 30 हजार रुपयांचा दंड आणि दीपक कन्स्ट्रक्शनने दंड भरला. धायरी येथील श्री कंट्रोल चौक ते काळूबाई मंदिर या रस्त्यावर काम करणाऱ्या या कंपनीने 10 हजार रुपयांचा दंड भरल्याची माहिती रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी यांनी दिली.
सहा प्रभाग कार्यालयांनी ही माहिती मुख्य रस्ते विभागाला सादर केली. त्यामध्ये औंध बाणेर प्रभाग कार्यालयातील 93 रस्ते, शिवाजी नगर घोले रोड कार्यालय 11, कोथरूड बावधन कार्यालय 81, वारजे कर्वेनगर 150, हडपसर मुंढवा 58, वानवडी रामटेकडी कार्यालय 68, कोंढवा येवलेवाडी कार्यालय 110, कसबा वॉर्ड कार्यालय 110, कसबा 18 वार्ड कार्यालयाचा समावेश आहे. या अहवालात एकूण 640 रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.