
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- लंपी या पशुरोगाला प्रतिबंध करण्यासाठी गुरांचे लसीकरण चार दिवसांत पुर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिले.
चांदुरबाजार पंचायत समितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.गटविकास अधिकारी एस.डी.श्रृंगारे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पंकज सोळंके यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
ही लस पूर्णपणे विनामुल्य आहे.गुरांना लस देण्यासाठी पैसे आकारल्यावरुन एका कर्मचाऱ्याला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे असा गैरप्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंडा यांनी यावेळी दिला.चांदुरबाजार तालुक्यात २६ हजार ५०० गोवंश जनावरांपैकी ३ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरीत लसीकरण पुढील चार दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश श्री. पंडा यांनी दिले.
या आजाराला मुख्यत्वे गायवर्ग बळी पडतो व म्हैसवर्ग बाधित होतो.तसेच म्हशींची प्रतिकारशक्ती अधिक असते.शेळ्या व मेंढ्यांमध्ये हा आजार आढळत नाही.बाधित गावांच्या पाच किलोमीटर परीघातील सर्व जनावरांचे विनामूल्य लसीकरणक करण्यात येत आहे.जिल्ह्यात १ लक्ष ६५ हजार ५०० लस पुरवठा झाला आहे.खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घेण्यात आली असून प्रति मात्रा ३ रुपये प्रमाणे मानधन देण्यात येत आहे.सर्व ग्रामपंचायत,नगरपालीका,महापालिका यांना किटकनाशक फवारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे,असे डॉ.सोळंके यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरावर ०७२१-२६६२०६६ हा संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून जनावरांमध्ये आजार आढळल्यास तत्काळ संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे १९६२ हा टोल फ्री क्रमांकही कार्यन्वित आहे.
अंजनगाव सुर्जी-दर्यापूर तालुक्यातील पाळीव जनावरांसाठी मोफत लस देण्याचे आवाहन
जिल्ह्यामध्ये सध्या पाळीव जनावरे उदा.गाय,बैल,म्हैस वर्ग या जनावरांमध्ये “लम्पी” या आजाराचा प्रादुर्भाव होत असून दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये लम्पी आजारापासून पाळीव जनावरांना प्रादुर्भाव रोखण्याकरीता खबरदारीचे अनुषंगाने वरीलप्रमाणे नमुद पाळीव जनावरांचे लागण झालेल्या गावापासुन ५ कि.मी अंतरावरील सर्व गावांमध्ये प्राधान्याने निशुल्क लसीकरण करण्यात येत आहे.असे दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांना उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांनी जाहिर आवाहन केले आहे.
तरी “लम्पी” आजाराबाबत आपलेकडे असलेल्या जनावरांमध्ये लक्षणे आढळुन आल्यास दर्यापुर तालुक्यातील नागरिकांनी डॉ.निचळ मो. क्र.९८५०५८८३५८ डॉ.देशमुख मो.क्र.९४२३६१०७७५ यांचेशी तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी सहायक आयुक्त डॉ.थोटे मो.क्र.८५५४८९७९२६ व डॉ.झोंबाडे मो.क्र.९४२३४२४१९७ यांचेशी दुरध्वनी वरून संपर्क साधुन लक्षणे आढळुन येणा़ऱ्या जनावरांचे फोटो व आपले नाव व संपुर्ण पत्ता व्हॉटसॲपव्दारे संबंधित पशुवैदयकिय अधिकारी यांना पाठवावे.त्याचप्रमाणे माहिती कळविण्याकरिता टोल फ्री क्र.१९६२ या क्रमांकाव्दारे संपर्क करावा.
तसेच “लम्पी” आजाराबाबत लक्षणे आढळुन येणाऱ्या जनावरांना इतर जनावरांपासुन विलगीकरणात ठेवावे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांनी गोठयांची फवारणी करुन परिसराचे निर्जंतुकीकरण करावे,असे आवाहन उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांनी केले आहे.