
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी-राम चिंतलवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिरपल्ली केंद्र – सिरंजनी ता. हिमायतनगर जि.नांदेड येथील उपक्रमशील जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री. डी. एच. जालने सर यांची कन्या कु. श्रेयश्री दत्ता जालने हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, उजळणी, पेन, अशा आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करत अनोखा आदर्शवत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
श्री. जालने सर हे एक उपक्रमशील, प्रयोगशील व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे अग्रगण्य शिक्षक म्हणून त्यांची परिसरात विशेष ओळख आहे. आतापर्यंत 19 वर्षांपासून सेवा बजावलेल्या विविध शाळांमध्ये त्यांनी त्यांच्या कार्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व नवनव्या संकल्पना सत्यात साकारणारे एक ‘कल्पक शिक्षक’ व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या कार्याचा अनोखा ठसा निर्माण केलेला आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे “माझी मुलगी, माझा अभिमान” या उक्ती प्रमाणे आपल्या कन्येचा वाढदिवस केवळ केक कापून साजरा करण्याऐवजी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, उजळणी, पेन, असे उपयुक्त शैक्षणिक साहित्य आणि स्वादिष्ट गोड खाऊचे वाटप करत एक आदर्शवत परंपरा निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबविला आहे.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव, उपाध्यक्ष राजु तपासकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. शिवाजी पाटील जाधव, श्री, मदनराव पाटील जाधव, माजी अध्यक्ष प्रभाकर जाधव, संदिप जाधव, धोंडबा निसाळकर, रविकांत जाधव, ज्ञानेश्वर बेंद्रे, नंदकिशोर पवार, सुभाष जळपते, लक्ष्मण गुमलवाड, अंगणवाडी ताई सौ. चंद्रकलाताई गर्दसवार मॅडम, जिजाबाई बेंद्रे, अरूणाताई जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री, गोणे सर व गावातील युवा वर्ग व महिला उपस्थित राहुन वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या अनुकरणीय आदर्शवत “वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा” उपक्रमाचे केंद्र- सिरंजनी चे केंद्रप्रमुख श्री, धात्रक साहेब, सुनिल राठोड सर, रावते सर, यादवकुळे सर, प्रा.डाॅ.गोविंद पाटील सर आणि केंद्र-सिरंजनी मधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील आदी मान्यवर आणि परिसरातील ग्रामस्थांकडून तोंडभरून कौतुक होत आहे.