
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर-:
मागील सात आठ वर्षांपासून देगलूर व परिसरातील शेती, पाणी, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण या प्रमुख विषयांना घेऊन सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या विश्व परिवार या संघटनेच्या वतीने *विश्व व्याख्यानमाला* आयोजित केले जाते. व्याख्यानमालेचे हे 7 वे वर्ष आहे. यावेळी 2 आक्टोंबर, रविवारी सकाळी 11 वाजता, बंडय्यपा मठ, गांधी चौक, देगलूर येथे ‘मोबाईलकडून शिक्षणाकडे.., व्यसनांकडून आनंदी आयुष्याकडे’ या विषयावर पुणे येथील समाज माध्यमांचे तज्ञ अभ्यासक मा. मुक्ता चैतन्य व शिक्षणतज्ञ शंतनू कैलासे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानमालेचे उदघाटन मा. आमदार जितेशजी अंतापूरकर व जि.प. नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घूगे यांच्या हस्ते संपन्न होणार असून माजी खासदार डाँ. व्यंकटेश काब्दे, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे, ब्रह्मकुमारीच्या लक्षी बहेनजी, तहसिलदार राजाभाऊ कदम, बिडीओ शेखर देशमुख, मुख्याधिकारी गांगाधर ईरलोड, पोलिस निरीक्षक सोहम माच्छरे, गट शिक्षण अधिकारी राजकुमार जाधवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मोबाईल, टिव्ही व सोशल मिडीयाच्या अति व गैरवापरामुळे विद्यार्थी, तरूण व समाजमनावर होणाऱ्या दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजनांबाबत विस्तृत मार्गदर्शन मिळणार असून परिसरातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विश्व परिवाराचे संस्थापक कैलास येसगे कावळगावकर यांच्या वतीने करण्यात आले.