
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : परभणी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराया ची महापूजा महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते भक्तीभावे करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच परभणी महापालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला निरोगी, उदंड व बलशाली आयुष्य लाभले जावे यासाठीचे साकडे सुध्दा आयुक्तांनी श्री खंडेरायांना घातले असावे यात तिळमात्र शंकाच नसावी.
चंपाषष्ठीच्या औचित्यावर आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने महापालिका आयुक्त हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून संबोधले जाणे स्वाभाविक आहे. किंबहुना त्याच अनुषंगाने सौ. तृप्ती सांडभोर यांना मिळालेला मान- सन्मान हा कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. तद्वतच देवस्थान व्यवस्थापकीय समितीतर्फे त्यांचा यथोचित सन्मानही केला गेला. या औचित्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदैवत स्थानापन्न असलेल्या खंडोबा बाजार परिसरात मोठी धामधुम होती.
याप्रसंगी मनपाचे रचनाकार कार्यालयाचे सहसंचालक शिवाजी जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जाधव, माजी उप महापौर भगवानराव वाघमारे, महानगर पालिकेचे माजी सभापती सुनील देशमुख, शिवाजी बनसोडे, माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.