
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कल्याण –
मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहार कुशलाने व तत्वज्ञानाने अधिष्ठित असलेल्या जातक कथा ह्या जगांतील कथा साहित्याचा एक स्त्रोत किंवा मूलाधार असून त्या मानवी जीवनाला आकार आणि दिशा देण्याचे आणि नैतिक मूल्यांचे बिजारोपन करण्याचे काम करीत जगाची संस्कृती उन्नत होण्यास मदत करीत असल्याने बुद्ध धम्म प्रणित संविधानिक नैतिकता राष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरली आहे, असे मार्मिक उद्गार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. दामोदर मोरे यांनी बोलतांना काढले. प्रज्ञा बोधी साहित्य अकादमी (रजि.) च्या विद्यमाने, संविधान गौरव दिनी, ‘भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म’ या विषयांवर आयोजित चर्चासत्राच्या कार्यक्रमांत, ज्येष्ठ बौध्द साहित्यिक डि. एल. कांबळे अनुवादित ‘बोधिसत्वाच्या जातक कथा’, खंड: सातवा, या ग्रंथाचे उद्घाटन करतांना, बुद्धभूमी फाऊंडेशन, अशोक नगर, वालधूनी कल्याण येथे ते बोलत होते. या वेळी साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ‘धम्मयान’ मासिकाचे कार्यकारी संपादक – ज्येष्ठ साहित्यिक निरंजन पाटील हे अध्यक्ष स्थानी होते आणि विचार मंचावर – अँड. शंकर रामटेके, शिवा इंगोले, सुनिल सोनवने, गिरीश लटके, आनंद देवडेकर, डि. एल. कांबळे, प्रा. युवराज मेश्राम आणि ग्रंथाच्या प्रकाशिका उषाताई कांबळे, आदिमान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाच्या प्रतिकांना वाहिलेला पुष्पमालांनी होताच डी. एल. कांबळे आणि उषाताई कांबळे या उभयतांनी पाली भाषेतील ‘रतन सुत्त’ मधूर स्वरांत गायिले. त्यानंतर बुद्धभूमी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पूज्य भदन्त गौतमरत्न थेरो यांनी धम्मदेशना दिली. प्रा, युवराज मेश्राम सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये, भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म यांच्या समन्वयातूनच प्रबुद्ध भारत राष्ट्राची निर्मिती होईल, असा आशावाद बोलताना व्यक्त केला. विचार पिठांवर उपस्थित मान्यवार अँड शंकर रामटेके म्हणाले की, “सामाजिक न्यायाशी निगडीत संविधान आणि बुद्ध धम्म ह्या दोन परस्पर सुसंगत प्रवृत्ती ज्या लोकशाही देशांत एकत्र नांदू शकतात, त्या देशांत राजा राणीच्या पोटातून नव्हे, तर मतपेटीतून जन्माला येतो. भारतात लोकशाही आहे. परंतू लोकशाही मानसिकता नाही. परिणामत: देशांत सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकली नाही आणि राजकीय क्षेत्रात एक व्यक्ती एक मत या मुल्यांना काही अर्थ उरलेला दिसत नाही”, असे ते म्हणाले. आपल्या समारोपिय अध्यक्षीय भाषणांत आपले विचार मांडतांना निरंजन पाटील यांनी, ‘’भारतीय संविधानाच्या सरनाम्यात नमूद केलेले देशाची उद्दीष्टे आणि बुद्ध धम्माचे ध्येय उद्दीष्टे सारखेच आहे. म्हणून शासन व्यवस्थेमध्ये बुद्ध धम्माचा साधन म्हणून वापर व्हावा, असे बाबासाहेबांना वाटत असावे”, असे सांगितले. विचार मंचावर उपस्थितीत सर्व मान्यवारांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रज्ञाबोधी साहित्य अकादमीचे सचिव प्रा. युवराज मेश्राम यांनी केले आणि संस्थेचे मुख्य संघटक यशवंत बैसाणे यांनी आभार मानले.