
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर;स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी रस घेतला असून पडद्यामागून राजकारण सुरु झाले आहे. जिल्ह्यातील १८१ गावातील राजकीय वातावरण चांगले तापु लागले आहे. भावकी, नातेगोते यांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी ४६१ तर सदस्य पदासाठी दोन हजार ६२० उमेदवार रिंगणात आहेत. १९ ग्रामपंचायतींचे सदस्य बिनविरोध झाले असले तरी उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरु झाली आहे.जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ४६१ तर सदस्यांच्या एक हजार ३९१ जागेसाठी दोन हजार ६२० उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुका मोठ्या चुरशीच्या होणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पडद्यामागून रस घेतला आहे.निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसतेग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनेल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.सर्वच राजकीय पक्षांचे लक्षजिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. यापैकी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. राजकीयदृष्ट्या मोठ्या ग्रामपंचायती आपल्या वर्चस्वाखाली असावेत, या भावनेतून सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी या निवडणुकीत पडद्यामागून लक्ष घातले आहे.