
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
रोहयो कर्मचारी बेमुदत संपावर
पालघर/जव्हार: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत “मागेल त्याला काम” या ब्रीदवाक्यखाली काम करणाऱ्या रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता ०१ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संपला सुरुवात करून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.ग्रामीण भागातील काही प्रमाणात स्थलांतर रोखण्यासाठी यशस्वी झालेल्या या रोजगार हमी योजनेच्या मजुरांची या कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.मजुरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी ही योजना ग्रामीण भागाची अर्थवाहिनी मानली जाते मात्र तालुक्यातील ५० ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विभागातील कामे ठप्प झाल्याने रोजगार हमी योजनेतील कामांवर अवलंबून असणाऱ्या मजुरांची परवड होण्याची शक्यता आहे.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक,क्लर्क डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य हे कर्मचारी ह्या संपात सहभागी झाले आहेत.रोजगार हमी कामांची यंत्रणा चालवणाऱ्या व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे कर्मचारी प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून नियमित काम करीत आहेत.कोविड काळात कोणतेही विमा संरक्षण नसतानाही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तुटपुंज मानधनावर काम करणे अवघड झाले आहे.त्यामुळे आपल्या विविध मागण्यांकरिता कर्मचाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत ०१ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन बेमुदत संप सुरू केला आहे.