
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथील प्रस्तावित इलेक्ट्रीकल ट्रीप लोको शेड नांदेडला हलविण्याच्या हालचाली द.म.रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने सुरू केल्याच्या विरोधात उद्या पूर्णा शहर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्या विरोधात संपूर्ण पूर्णा शहरात कमालीचा असंतोष पसरला आहे. रेल्वे संघर्ष समितीने बुधवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण पूर्णा शहर बंदचे आवाहन केले आहे. सकाळी रेल्वे स्थानकासमोर इलेक्ट्रीकल होम लोको ट्रीप शेडसह विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.
याच लोको ट्रीप होम शेडसह सुमारे सव्वाशे वर्षांपासून कार्यरत असलेले पूर्णा येथील डिझेल लोको शेड पुन्हा पूर्णा येथे स्थलांतरित केले जावे यासाठी ‘चालू वार्ता’ या मराठी दैनिकाने दोन दिवसांपूर्वीच परखड वृत्त प्रकाशित करुन आवाज उठविला आहे. पूर्णा शहरासह संपूर्ण परभणीचे वैभव नाहिसे केल्याच्या प्रवृत्ती विरोधात संपूर्ण जिल्हावासियांनी एकत्र येण्याची व खंबीरपणे लढा देण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे आवाहन ही केले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिंतूर येथील भाजपाच्या महिला आमदार बोर्डीकर यांनीही तीव्र विरोध करीत थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच त्यांनी पत्र पाठवून साकडे घातले आहे. पूर्णा येथे होऊ घातलेले इलेक्ट्रीकल ट्रीप लोको होम शेड नांदेड येथे स्थलांतरित केले जाऊ नये म्हणून त्यांनी त्या पत्रात कडवा विरोध केला आहे. त्यांनी आपल्या पत्रात संताप व्यक्त केला आहे, तसा संताप परभणी जिल्ह्यातील अन्य सर्वंच लोकप्रतिनिधींनीही करावा, अशी कळकळीची विनंती दै.चालू वार्ता ने तमाम पूर्णा-परभणी वाहिन्यांच्या वतीने केली जात आहे.
केवळ भाषा द्वेष आणि कुटील हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सिकंदराबाद विभागातील अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेळोवेळी दिशाभूल केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून पूर्णा शहरातील जुने व नवनवीन रेल्वेचे प्रकल्प आणि महत्वपूर्ण असे विभाग नांदेड व अन्यत्र वळविले आहेत.
पूर्णा येथेच होम शेड निर्माण केले जावे म्हणून मागील अनेक वर्षांपासून येथील जनता सातत्याने मागणी करीत आली आहे. येथे इलेक्ट्रीकल लोको शेड उभारले जाईल असे लेखी आश्वासन देऊनही अखेर येथील जनतेचा विश्वासघात करण्यात आला. एका बाजूला गोड बोलायचे दुसऱ्या बाजूला अंधारात ठेऊन येथूनचा एकेक विभाग हलविले गेले. ही कुटील नीती सातत्याने अजूनही सुरुच आहे. किंबहुना त्यासाठीच पूर्णा वासियांनी आता पूरती कंबर कसली आहे. पूर्णा व परभणीच्या विकासाआड येणारे जे जे रेल्वे अधिकारी, नांदेड विभाग, सिकंदराबाद विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या विरोधात आता आंदोलनाचे शड्डू ठोकण्यासाठी काल पूर्णा येथील पालीचा सभागृहात ते सारे एकवटले होते. येथे प्रस्तावित इलेक्ट्रीकल ट्रीप लोको होम शेड बरोबरच पूर्णेतील रेल्वेमार्गावर पादचारी पूल बांधण्यात यावा, तिकीट कार्यालय व पार्सल विभागाचे कंत्राटीकरण रद्द करावे, प्लॉट फॉर्म नंबर एक वर तिकीट खिडकी सुरू करण्यात यावी, येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना कमी करु नये अथवा अन्यत्र कुठेही हलविले जाऊ नये, रेल्वेतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता रेल्वे लोहमार्गासाठी पोलीस ठाणे स्थापन करावे, विशेष गाड्यांच्या नावाखाली सुरु असलेली भाडे वाढ कमी करण्यात यावी या व अशा अनेक मागण्या मार्गी लागाव्यात म्हणून रेल्वे स्थानक परिसरातील धरणे आंदोलन समयी रेल्वे प्रशासनाला एक खरमरीत निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी पूर्णा शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन या धरणे आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.
एकूणच संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही, हे सुत्र ध्यानी घेऊन भविष्यात मोठा लढा उभारल्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे म्हटले तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.