
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र सालबर्डी आणि श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भाविकांची गर्दी असते.या दृष्टिकोनातून तयारी सुरू झाली आहे.राज्य परिवहन महामंडळानेही विशेष गाड्यांमधून भाविकांना सुविधा देण्याचे नियोजन केले आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सालबर्डी यात्रेचा लाभ भाविकांना घेता आला नाही.त्यामुळेच आतापासून अनेकांनी योजना आखल्या आहेत.महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र सालबर्डी व श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे १५ ते २३ फेब्रुवारी दरम्यान श्री शंभू महादेव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येतात.दोन वर्षांपासून प्रवास न झाल्याने यावेळी यात्रेत गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यावेळी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागातर्फे प्रवासादरम्यान अमरावती,धामणगांव रेल्वे,परतवाडा,चांदूर बाजार,दर्यापुर,वरूड,मोर्शी,तिवसा,येथून प्रवाशांसाठी थेट बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर करिता अमरावती आणि बडनेरा बस स्थानकावरून अतिरिक्त बस व्यवस्था करण्यात आली आहे.
—————————————-
यात्रेकरूंनी अवैध वाहतूक करणाऱ्या धोकादायक वाहनांतून प्रवास न करता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा.
– निलेश बेलसरे,विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ