
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तानाजी सावंत हे फार मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्या पाठीमागे पूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा भार आहे. ते नेहमीच व्यस्त असतात. राजकीय दृष्ट्या मागास जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याइतपत मंत्री तानाजी सावंत हे इतके लहान नाहीत. त्यामुळे त्यांच्या ऐवजी दुसरा पालकमंत्री परभणी जिल्ह्याला द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात श्री बोलने यांनी असेही नमूद केले आहे की, परभणी जिल्ह्यासाठी ना. तानाजी सावंत यांच्याऐवजी जो कोणी पालकमंत्री द्याल, तो सक्षम असला पाहिजे, पूर्णवेळ कटाक्ष राखणारा आणि परभणी जिल्ह्याप्रति जिव्हाळा असलेला मंत्री देणे आवश्यक आहे. ज्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या व अन्य ज्या काही महत्त्वाच्या बैठका असतात, त्या नियमितपणे घेणारे मंत्री हवे आहेत. तसं झालं तर आणि तरच जिल्हा विकासासंबंधीची व अन्य प्रलंबित सर्व कामांचा उरक करणे शक्य होऊ शकेल.
अगोदरच राजकीय दृष्ट्या मागास व विकासापासून वंचित जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्याची हेळसांड करुन ठेवली आहे. त्यातच हाय फाय महाराष्ट्रात मनसोक्त वावरणाऱ्या अशा मंत्र्यांना परभणीचे महत्व आणि समस्या त्या काय कळणार, असा सवाल करुन ज्यांना परभणीकरांप्रति जिव्हाळाच नाही अशा मंत्र्यांऐवजी सक्षम, पूर्ण वेळ पालकमंत्री म्हणून नियुक्ती करावी आणि पूण्य वाटून घ्यावे, असा मर्मभेदी चिमटाही बोलने यांनी घेतला आहे.