दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे :- समाज्यातील प्रत्येक घटकाला “शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा” असा मोलाचा संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त लोकायत नागरी समितीच्या वतीने पुण्यातील विविध वाड्या-वस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन समाज परिवर्तन व बदल घडविण्यासाठी कलात्मक सादरीकरणाने संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या कष्टकरी,कामगार, महिला व शेतकरी वर्गाच्या हक्क आणि अधिकारासाठी बाबासाहेबांनी दिलेला लढा तसेच शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील अमुल्य योगदानाबाबत समाज्यात जनजागृती व्हावी व समाज परिवर्तन व्हावे या उद्देशाने पुण्यातील विविध वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन गाणी गाऊन, बतावणीच्या माध्यमातून, स्टिकर अभियानाद्वारे जनजागृती करण्यात आली.. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता सारख्या शब्दांचा अर्थ, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता अशा विविध पैलूंवर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यातील भावनांना जागृत करण्याचे काम लोकायत नागरी समितीच्या वतीने करण्यात आले यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संविधान मेळाव्यात विविध उपक्रमांचा स्टॉलही लावण्यात आला होता .
पुण्यातील डायस प्लॉट गुलटेकडी, मीनाताई ठाकरे वसाहत, चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी, मंगळवार पेठ, गंज पेठ येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थितांकडून जय भिम!, बाबासाहेबांचा इतिहास, सर्वांना सांगणार!!, संविधान जिंदाबाद!! अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनही करण्यात आले.
“जय भीम” म्हणजे बाबांसाहेबांचा,त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याच्या विजय असो! असे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘जय भीम’ तेव्हांच सत्य ठरेल जेव्हा आपण बाबांसाहेबांचे विचार आणि कार्य जिवंत ठेवू, ते आपल्या आचरणात आणू”
मोनाली अपर्णा -लोकायत नागरी समितीच्या समन्वयिका
