
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी- वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यात होत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून, काल दि.२४ ला जिल्ह्याचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले, रिसोड चे संत अमरदास बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन भाजप शिवसेना व मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेतकरी सहकार विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा श्री गणेशा केला. येथील भोमावत मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रचाराचा शुभारंभ करताना ” अफवा व कोणत्याही भुलथापांना बळी न पडता शेतकरी सहकार विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा..! असे आवाहन शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केले असल्याचे; शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेंद्र बोडखे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी केले. अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार विजयराव जाधव, सहकार नेते वामनराव देशमुख, यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणाले की, भाजप, सेना व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपला शेतकरी हिताचा दृष्टिकोन मतदारांना कळला पाहिजे. आपल्या सर्वांच्या एकजुटीतून ही निवडणूक जिंकणे व परिवर्तन घडवणे, सहज शक्य असल्याचे देखील माजी खासदार देशमुख म्हणाले. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे, बाळासाहेब खरात, गजाननराव लाटे, शंकरराव बोरकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, नगराध्यक्ष ॲड. कृष्णाजी आसनकर, तालुकाप्रमुख खानझोडे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्र पक्षाचे तालुका तथा, जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. संयुक्तिकरित्या झालेल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी शेतकरी सहकार विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार व आवाहन करण्यात आले.