दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
23 एप्रील (वेल्हा)
वेल्हे – नवज्योत परिवार ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती वेल्हे बाल विकास प्रकल्प अंतर्गत वेल्हे विकास गटातील कुपोषित बालकांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी यापुढेही कुपोषित बालकांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येणार असून वेल्हे तालुका कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार दोन्ही संस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
वेल्हे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये कुपोषित बालकांना राजगिरा व शेंगदाणा लाडू,खारीक,बदाम,काजू व मनुके आदी पौष्टिक आहाराची पाकिटे देण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेल्हे पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी साखरे साहेब,नवज्योत परिवार ट्रस्टचे अध्यक्ष संजय लगाडे, लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम अध्यक्ष महेश गायकवाड यांच्यासह संस्थेच्या सचिव शीतल लगाडे, मंगेश वांजळे, पूजा पारेख, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका वृषाली साबणेमॅडम,पंचायत समितीच्या कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी शिंदे मॅडम, चव्हाण साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकूण 22 कुपोषित बालकांना आहार वाटप करण्यात आले, याप्रसंगी बालकांच्या पालकांसह अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणावर हजर होत्या.
वेल्हे हा अतिशय दुर्गम व डोंगरी असा भौगोलिकदृष्टया विस्तीर्ण तालुका असून यामध्ये पानशेत, पासली व वेल्हे असे तीन बीट येतात.या तिन्ही बीटमध्ये येणाऱ्या गावातील प्रत्येक अंगणवाडी मधील सेविका व मदतनीस यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अंगणवाडी सेविका आशा घोडके या मावशींनी अतिशय भावनिक शब्दात सांगितले की, एकदा माझ्या मुलाने मला विचारले की,आई तुला किती मुलं आहेत? कारण मी त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरले होते. त्यावेळी मी उत्तर दिले की, मला तेरा मुलं आहेत, त्यावेळी मुलगा आश्चर्यचकित झाला आणि भांबावून गेला, तेंव्हा मी त्याला सांगितले अरे अंगणवाडी मध्ये मी सांभाळ करते ती देखील तुझीच भावंडं आहेत’.
.यावेळी आपले विचार मांडताना साखरे साहेब, संजय लगाडे, महेश गायकवाड यांनी उपस्थित बालक, पालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस याना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाच वृषाली साबणे यांनी ‘बाळंत विडा व ग्राम बाल विकास संकल्पना’ अंतर्गत असलेल्या ५० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली.
