
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :- तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी यांच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे.या प्रकारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रहारने केलेली आहे.
येथील ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चौखंडे हे अचानक आजारी रजा टाकून सुट्टीवर गेले.त्याच काळात त्यांची बदली झाली.त्यानंतर कोरोना काळापासून येथील ग्रामविकास अधिकारी पदाचा भार अतिरिक्त स्वरूपात निरंजन गायगोले यांच्याकडे सोपविण्यात आला होता.काही काळानंतर निरंजन गायगोले हे सुद्धा आजारी रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी सुभाष खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.परंतु अवघ्या काही दिवसातच सुभाष खंडारे दीर्घ रजेवर गेल्याने त्यांच्या जागी कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती न करता पदभार अतीरिक्त स्वरूपात राहुल कीटूकले,निरंजन गायगोले,अरुण रायबोले यांच्याकडे आलटून-पालटून सोपविण्यात आला.सद्यस्थितीत १८ एप्रिल पासून अरुण रायबोले हे सुद्धा आजारी रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर पुन्हा गटविकास अधिकारी यांनी १९ एप्रिल रोजी दिनेश टोळे यांना अतिरिक्त स्वरूपाचे नियुक्तीचे आदेश दिले.मात्र,दिनेश टोळे हे सदर आदेशपत्राला बगल देत अद्यापही रुजू झाले नाहीत.त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबली आहेत.त्यांच्या निवृत्तीनंतर येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी प्रहारच्या वतीने प्रदीप वडतकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.