
दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधि -अमोल आळंजकर
गंगापूर : बीडीओंच्या बहिष्कारामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील सर्व कामे बंद पडली असून, या आठवड्यात ही कामे सुरू न झाल्यास जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना टाळे लावण्याचा इशारा ग्रामसंवाद सरपंच संघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा धामोरी खु चे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी रोहयोच्या अपर मुख्य सचिवांना मेलद्वारे दिला आहे.
याबाबत रवींद्र चव्हाण म्हणाले, रोजगार हमी योजनेंतर्गत येणाऱ्या कामावर गेल्या एक महिन्यापासून गटविकास अधिकारी यांनी बहिष्कार टाकल्याने सर्वच कामे बंद आहेत.बीडीओच्या बहिष्कारामुळे मजुरांसह लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत. लाभार्थ्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे ग्रामस्तरावर सरपंचांना या
सर्व बाबींचा मोठा त्रास होत आहे.अगदी महिन्याभरावर पावसाळा येऊनठेपला असल्याने, पाऊस पडल्यानंतर विहीर, रस्ते यासह इतर कामे केल्या जात नाहीत.यामुळे या वर्षात ही कामे अर्धवट स्थितीत पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या आठवड्यात गटविकास अधिकाऱ्यांचा संप मिटला नाही, तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना टाळे लावण्यात येईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.