
मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
मुख्याधिकारी यांनी दिले लेखी पत्र
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती व विघ्नहर्ता कामगार संघटनेच्या मार्गदर्शनात सफाई कामगार विविध मागण्यांसाठी काम बंद ठेवून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयासमोर शनिवार (दि.१२) रोजी उपोषणाला बसले होते.परंतु मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी मागण्या पूर्ण करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने रविवार (दि.१३) रोजी उपोषण मागे घेण्यात आले.
कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या मजुरांनी आपला भविष्य निर्वाह निधी,विमा,समान काम समान वेतन,जून-जुलै महिन्याचे मासिक वेतन,सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ पर्यंतच्या कालावधीचा ईपिएफ चा भरणा,मासीक वेतन दरमहा पाच तारखेला देण्यात यावे,साप्ताहिक सुटी इत्यादी मागण्यांबाबत सतत पाठपुरावा केला आणि २८ जुलै पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रशासनाला कंत्राटी कामगारांनी दिला होता.प्रशासनाने सदर मागण्यासंबंधी दखल न घेतल्याने त्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष सचिन गावंडे तसेच कामगार प्रतिनिधी हरिश्चंद्र वानखडे,कुणाल समुंद्रे,संदीप भोंडे,इमरान भाई आदीसह कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन शनिवार (दि.१२) पासून न.प.कार्यालयासमोर उपोषणास सुरवात केली असता रविवार (दि.१३) रोजी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व लेखी स्वरूपात पत्र देऊन उपोषणकर्ते व कंत्राटी तत्वावर कामगारांना सकारात्मक प्रतिसाद दिला व उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.