
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):कला शाखेतून बारावीचे त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही नोकरीची खात्री नाही. त्यातल्या त्यात कला शाखेत नोकरी व करिअरच्या संधी मर्यादित आहेत. याउलट विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यास रोजगाराच्या संधी अधिक आहेत. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेला अधिकाधिक प्रवेश होत आहेत. कला शाखेचे कॉलेज आणि तुकड्या विद्यार्थी संख्येअभावी मोडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अकरावीच्या कला शाखेला कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी? अशी विचारणा उच्च माध्यमिक शिक्षक करीत आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील एकमेव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. येथे पाच ते सहा शाखा आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर शासकीय आयटीआय आहेत. सर्वसामान्य घरातील अनेक विद्यार्थी हे आयटीआयला आणि शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतात.
जिल्ह्यात अकरावीच्या जवळपास २५ हजारांवर जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने यंदा इयत्ता अकरावीच्या अनेक जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. यामध्ये कला शाखेच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. प्रत्यक्षात पाहता ८० ते ९० टक्केवारीच्या विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शाखेकडे दिसून येतो. मात्र आता भवितव्याच्या दृष्टीने करिअरचा विचार करता ४५ ते ५० टक्के गुण मिळविणाऱ्यांचाही कलही विज्ञान शाखेकडे दिसून येत आहे. त्यामुळे कला
शाखेकडे विद्यार्थ्यांचा जाण्याचा मूडच दिसून येत नसल्याने महाविद्यालयांमध्ये कला शाखेसाठी आता विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे नुकत्याच लागलेल्या दहावी शालांत परीक्षेच्या निकालानंतर कला शाखेसाठी कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी, असे म्हणण्याची वेळ आलेली सध्या देगलूर तालुक्यांत दिसून येत आहे.
चौकाटीत
सीबीएसई’चे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे अधिक वळताना दिसून येतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. मराठी माध्यमातून दहावी उत्तीर्ण झालेले आणि ४५, ५० ते ६० टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे भवितव्याच्या दृष्टीने आज कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेलाच अधिक महत्व दिले जात आहे.