
दैनिक चालू वार्ता
कळंब/प्रतिनिधी
समीर मुल्ला
धाराशिव/कळंब
तालुक्यातील करंजकल्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मंगळवार (दि.१८) रोजी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक संजय नारायण पवार यांनी त्यांचे वडिल कै.नारायण तुकाराम पवार (गुरुजी)यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी सिमेंट काँक्रीटचे सुमारे १.५ लक्ष रुपयांचे भव्य असे प्रवेशद्वार बांधून व रंगकाम करून त्यावर शाळेचे नाव टाकून दिले आहे. त्यामुळे शाळेची इमारत व शाळेचा परिसर अतिशय सुंदर व आकर्षक दिसत आहे. तसेच प्रत्येक वर्षी वडिलांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपये शाळेस भेट देणार असल्याचे जाहीर केल्यामुळे निश्चितच शाळेच्या विकासास व विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागणार आहे. त्यांच्या या सामाजिक कौतुकास्पद कार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद पवार व शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज दिवाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत गट कळंब यांच्यावतीने शाळेतील पहिली ते आठवीच्या हुशार व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान धाराशिव जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मा. दत्तात्रय लांडगे साहेब व मूल्यमापन कृती कार्यक्रम अधिकारी SCERT महाराष्ट्र पुणे चे डॉ. चंदन कुलकर्णी हे या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. डॉ.चंदन कुलकर्णी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये का केली आहेत? व त्यातील रिकाम्या पानांचा वापर कसा करावा.याबद्दल सखोल माहिती दिली. ही शाळा गुणवत्ताधारक असून विविध शालेय उपक्रम राबवत आहे. म्हणून या शाळेतील ८ वीचा वर्ग मी दत्तक घेतला असून त्यावर्गासाठी मी वर्षभर विविध शालेय उपक्रम घेणार आहे. असे सांगितले.
तसेच उपशिक्षणाधिकारी श्री. दत्तात्रय लांडगे यांनी ही शाळा कळंब तालुक्यातील आदर्श शाळा असून या शाळेतील शिक्षक, गावातील ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या सहकार्यामुळे व योगदानामुळे ही शाळा दिवसेंदिवस नावारुपास येत आहे. प्रशासनाकडून आमचे सहकार्य सदैव त्यांना मिळत राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम ढेपे यांनी केले. प्रास्ताविक अखिल कुलकर्णी यांनी केले तर आभार संघरत्न कसबे यांनी मानले.
या कार्यक्रमास शाळेतील बाबू बोंदरे, बापू भंडारे, अखिल कुलकर्णी, अनिता रानभरे व स्मिता कुलकर्णी हे सर्व शिक्षक व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.