
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे. दर महिन्याला जिल्ह्यातील एकूण पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्याची नोंद आणि तुलनात्मक आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून घेतला जातो. त्यामध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याला सन्मानित करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कार्याची नोंद करत त्यांना तसे प्रमाणपत्र ही देण्यात आले. अत्यंत शांत, संयमी आणि कार्य तत्पर असलेले पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे यांचा सन्मान स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केला आहे.
आपले काम भले आणि आपण भले, अशा पद्धतीने कार्यपद्धती ठेवलेल्या पो. नि.अरविंद पवार यांच्या एकूण कामगिरीबद्दल उदगीर तालुक्यातील सर्वसामान्य माणूस समाधानी आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावे आहेत, तुलनेत मनुष्यबळ कमी असताना देखील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने गुन्ह्याचा तपास करणे, प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाणात अत्यंत कमी ठेवणे, नियोजनबद्ध पद्धतीने उत्कृष्ट कार्य करून आपला ठसा उमटवण्यामध्ये पो. नि. अरविंद पवार आणि तानाजी चेरले यांचा हातखंडा आहे. खऱ्या अर्थाने पोलिसांचे जे ब्रीद आहे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” याची प्रत्यक्ष अंमलबजावणी उदगीर ग्रामीण पोलीस करत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. अत्यंत मितभाषी परंतु कार्यामध्ये कधीही हलगर्जीपणा न करणारे अधिकारी म्हणून अरविंद पवार यांची ओळख आहे. स्वभावाने कठोर वाटत असले तरी कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिली पाहिजे, यासाठी कधी कधी ते कठोर भूमिका घेतात. उदगीर शहराचा बराच भाग उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असला तरी, कुठेही कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही, याची दक्षता स्वतः पो. नि.अरविंद पवार आणि त्यांचे सहकारी घेत असतात. ही उल्लेखनीय बाब आहे. ही सामाजिक जबाबदारी पार पाडत असतानाच पोलीस प्रशासनाच्या कामात देखील अव्वल राहणे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण स्वतः काम करत असतानाच आपल्या कर्मचाऱ्याकडून देखील त्याच तत्परतेने काम करून घेण्यामध्ये पो. नि. अरविंद पवार आणि पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे पटाईत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यावर पूर्ण विश्वास दाखवत असल्यामुळे, कर्मचारीही उत्स्फूर्तपणे आणि विश्वासाने काम करत असतात. एकूण या एकजुटीमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा उजाळत चालली आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या कार्यामध्ये सतत मग्न राहणारे पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले व हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सन्मानित केल्याबद्दल उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने तसेच उदगीर तालुक्यातील सर्व जनतेतून कौतुकाचा आणि अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या एकूण कामकाजाचा आढावा घेत असताना कौतुकास्पद कामगिरीमध्येही उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अव्वल ठरले आहे. तसेच सी सी टी एन एस डाटा फीडिंग मध्ये देखील उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अव्वल ठरले आहे. गेल्या महिन्यातील एकूण कामकाजामध्ये दोन वेळा पो. नि.अरविंद पवार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल टी के कज्जेवाड यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कर्तबगार आणि विविध कार्यप्रणालीमध्ये सन्मानित करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांचे फोटो लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये दर्शनीय भागात लावले आहेत. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालेल्या या बहुमानाबद्दल निश्चितच जिल्ह्यामध्ये उदगीरचे नावलौकिक वाढले आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.