दै.चालु वार्ता,
लातूर, प्रतिनिधी
लातूर (उदगीर) : लहान मुलांना गोष्टी ऐकायला आणि वाचायला खूप आवडतात. यामुळे आमचे भावनिक समाधान होऊन मानसिक विश्व समृद्ध होण्यास मदत होते. असेच आमचे भाव विश्व रंगवून जीवन रंगतदार बनवणाऱ्या गोष्टीचे पुस्तक म्हणजे रंगतदार गोष्टी हे होय. असे मत कु.शर्वरी सोमवंशी हिने व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. नामदेव खंडगावे यांचे अध्यक्षतेखाली ‘चला कवितेच्या बना’त या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या 320 व्या विशेष बालवाचक संवाद मध्ये इयत्ता तिसरीत शिकत असलेली कुमारी शर्वरी अनिता अमोल सोमवंशी या विद्यार्थिनीने सी.के.संपत संपादित व अशोक बावगे अनुवादित रंगतदार गोष्टी या साहित्यकृतीवर संवाद साधला. एकूण 14 कथा असलेल्या या पुस्तकातल्या मुलांचे मानसशास्त्र व आवडीनिवडी यावर आधारित त्याचबरोबर पंचतंत्र हितोपदेश अशा संस्कार करणाऱ्या निवडक कथांवर तिने भाष्य केले. अत्यंत सहज व्यक्त झालेल्या शर्वरीने यावेळी काही कविता देखील म्हणून दाखवल्या.
यानंतर झालेल्या चर्चेत सुचिता कदम, आदर्श शिक्षक गुंडप्पा पटणे, तुळशीदास बिरादार,अनंत कदम, राजाराम बिरादार यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. आपल्या बुद्धी कौशल्याने तिने श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देखील दिली. शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ. खंडगावे म्हणाले की, लहान मुलांना परी, राजा-राणी, पशु-पक्षी अशा कथांचे विलक्षण आकर्षण असते. कथांमुळे मुलांचे भावनिक समाधान होऊन त्यांचे मानसिक विश्व समृद्ध होण्यास मदत होते. अवघ्या नऊ वर्षे वयाच्या शर्वरी या लहानशा चिमुकलीने खुपच सुंदर विवेचन केल्यामुळे कौतुक ही केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजपाल पाटील यांनी केले, संवादिकेचा परिचय तिचे आजोबा बाबुराव सोमवंशी यांनी करून दिला. तर आभार मुख्याध्यापक संजय जाधव यांनी मानले
