
पुणे:राठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी थेट निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे ठरवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली असून, मराठा मतं यावेळी एकाच दिशेने निर्णायक ठरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.
मराठा समाज असं एका दिशेने मतदान करु शकतो का आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून तयार झालेल्या असंतोषाचा नेमका काय परिणाम दिसू शकतो? याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतलाय.
कोपर्डीच्या घटनेनंतर 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांती चौकापासून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला, तेव्हापासून कृष्णा बांबर्डे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आहे.
तेव्हा इंजिनियरिंग करत असलेला कृष्णा आता फार्मसीचा व्यवसाय करतो, तर पुण्याचा डेक्कनवरचा अनिकेत देशमाने गेल्या 14 महिन्यांपासून म्हणजे जरांगेंचं आंदोलन सुरू झालं, तेव्हापासून आंदोलनात उतरला आहे.
दोघांची भूमिका एकच आहे, ती म्हणजे ‘आरक्षण नसल्यामुळे आमच्या करिअरचं नुकसान झालंय. आता पुढच्या पिढीच्या वाटेला ते येऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करतोय.’
कृष्णा आता 28 वर्षांचा आहे. आंदोलनात आला तेव्हा त्याचं शिक्षण सुरू होतं. तो सांगतो की, मुळात फार्मसी सुरू करण्याचा त्याचा विचार नव्हता. इंजिनियरिंग पूर्ण केल्यावर आधी त्याने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण महिन्याकाठी फक्त 8 ते 10 हजार रुपये देऊ केले जात होते. मग त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी केली, पण तिथेही यश न मिळाल्याने शेवटी तो व्यवसायात उतरला.
आंदोलनात सहभागी होण्याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, “42 वर्षांपूर्वी स्वर्गीय आण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला. आज या 42 वर्षांच्या आरक्षण आंदोलनात अनेक जण आलेत. आमच्यापासून नियतीने बरंच हिरावलंय. माझं वय 28 आहे. हा लढा माझ्या जन्माच्या आधीपासून आहे. आता मीही ‘एज बार’ होणार. तरीसुद्धा आरक्षण मिळालं नाही.”
“संविधान आम्हाला सांगतं, सगळे भारतीय समान आहेत. माझे आईवडिल शेतीत राबतात. कष्ट करतात. त्यातून माझं इंजिनियरिंगचं शिक्षण केलं. मला 60 हजार फी होती इंजिनियरिंगची. माझे बांधव एससी, एसटी, ओबीसी, कोणाला 2 हजार, कोणाला 5 हजार फी असूनही स्कॉलरशिप. आम्हाला कुठलीही सवलत नाही. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यावेळी माझ्या मित्राला 70 मार्क पडले आणि मला 77. पण त्याला नोकरी लागली आणि मी मात्र घरी बसलो. ही कुठली तुमची सामाजिक व्यवस्था?” असा प्रश्न कृष्णा विचारतो.
कृष्णाला गेली अनेक वर्ष या मुद्द्यांची मांडणी करतोय, तर अनिकेत मात्र अगदी अलिकडे याबद्दल विचार करायला लागला आहे.
अनिकेतचे वडील रिक्षाचालक होते. पुण्यातच त्याचं शिक्षण झालं. शिक्षण सुरू असतानाच शाळेपासून तो खेळातही सहभागी झाला. आर्चरी खेळणारा अनिकेत राष्ट्रीय पातळीवरही मेडल्स मिळवत होता. पण शिक्षण आणि खेळ असा प्रवास सुरू असतानाच वडिलांचं निधन झालं आणि घराची जबाबदारी अनिकेतवर आली. मात्र, जरांगेंच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यावर तो आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झाला.
मराठा आरक्षणाचा लढा एका अर्थाने निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ही निवडणूक आरक्षणाच्या प्रश्नाला मार्गी लावणारी ठरेल अशी अपेक्षा अनेकांना वाटते आहे. जे तसं आश्वासन देतील त्यांनाच मतदान करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं जातंय. मात्र, मराठा आरक्षणाच्या वाटेतला मुख्य अडथळा ठरतोय तो 50 टक्क्यांची मर्यादा. निवडणूक संपल्यावर दिलेल्या आश्वासनांचं काय होणार आणि मराठा आरक्षणाच्या वाटेतले हे तांत्रिक अडथळे दूर कसे केले जाणार हा प्रश्न निवडून आलेल्या नेत्यांसाठी महत्त्वाचा राहील हे मात्र नक्की.