पुणे:लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सुजय विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. सुजय विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शड्डू ठोकलाय.
त्यांनी थोरात यांच्याविरोधात प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, सुजय विखेंनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचा उल्लेख राजकन्या असा केला होता. त्यानंतर जयश्री थोरात यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. “कोणाची टिंगल करत आहात. मी थोरात साहेबांची मुलगी आहे. संयम राखू शकते. पण लक्षात ठेवा, मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची नात सुद्धा आहे. चांगली खनकावू पण शकते”, असं जयश्री थोरात म्हणाल्या होत्या.
बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
दरम्याना, आता सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आज (दि.25) सुजय विखे यांची सभा झाली. सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. टीका करणारे वसंतराव देशमुख धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय.

