पुणे:महायुतीच्या दिल्लीत झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सामावून घेण्यासाठी त्याग करण्याची तयारी दाखवली असून १६०ऐवजी १५० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षांतील इच्छुकांना सामावून घेण्यासाठी त्यांना अनुक्रमे ८० ते ८५ आणि ५० ते ५५ जागा दिल्या जातील.
भाजपचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाऊ लागले आहेत. आज अंधेरी पूर्वसाठी मुरजी पटेल या भाजप उमेदवाराने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, तर नांदेडचे माजी खासदार भाजप नेते प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करत लोहा मतदारसंघाची उमेदवारी स्वीकारली. विद्यमान परिस्थितीत परस्परांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करताना कुठेही बंडखोरी होऊ नये याची
काटेकोर काळजी घ्या, असे अंजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डोळ्यात घातले असल्याने आता तिन्ही पक्ष बंडखोरी रोखण्याच्या कामाला लागणार आहेत. एकमेकांच्या जागा पाडण्यात नुकसान आहे, असे अमित शहा यांनी निक्षून सांगितले असल्याचे समजते.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत २८८ जागांवरील तिढा जवळपास सुटला आहे. दिल्ली येथे बैठक सुरू झाली तेव्हा २५ जागांबद्दल वाद होता. कोणत्या जागा कोणी लढवायच्या याबद्दलचा निर्णय घेणे कठीण होत होते; मात्र तीन तासांच्या बैठकीनंतर केवळ १० जागांचा प्रश्न उरला आहे. जागांचा प्रश्न परस्परांना विश्वासात घेऊन सोडवला जाणार आहे. ‘सकाळ’कडे असलेल्या माहितीनुसार, वसई, बोईसर, अंधेरी पूर्व, वडगाव शेरी, चेंबूर, धुळे ग्रामीण, नांदेड पश्चिम, कन्नड आणि कलिना या जागांवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. तसेच, नालासोपारा येथे भाजपने उमेदवार घोषित केला असला तरी ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवी आहे.
परिस्थिती बदलत असल्याचे चित्र…
भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील परिस्थिती बदलत असल्याचे चित्र समोर येत आहे, ते अधिक बदलण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि महाविकास आघाडीशी लढताना महायुतीने परस्परांमध्ये साहचर्य ठेवावे, हे निश्चित करण्यात आले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षातील इच्छुकांना सामावून घेण्यासाठी त्यांना अनुक्रमे ८० ते ८५ आणि ५० ते ५५ जागा दिल्या जातील. त्या स्थितीत भारतीय जनता पक्ष १६०चा आग्रह सोडून १५० जागांवर लढण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना सामावून घेण्याच्या त्यागात आम्हाला कोणताही अनादर वाटत नाही, असे सांगण्यात आले…


