
Mumbai, May 26 (ANI): Leader of Opposition in Maharashtra Assembly and Nationalist Congress Party (NCP) leader Ajit Pawar during a joint press conference, at YB Chavan Auditorium in Mumbai on Thursday. (ANI Photo)
पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार फटकळ स्वभावाचे आहेत. कोणालाही बोलताना ते मुलाहिजा न ठेवता सडेतोड बोलतात. बाहेरुन कणखर असलेले अजितदादा मायाळू आहे. कार्यकर्त्यांवर आलेले संकट ते आपले संकट समजतात.
कार्यकर्त्याच्या लेकीच्या काळजीने अजितदादा नावाचा पहाड गलबगून गेला. रात्रभर जागा होता. त्याचा अनुभव कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी तो शेअर केला आहे.
काय आहे त्या पोस्टमध्ये…
बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधत असताना अनेकजण दादांनी केलेल्या विकासकामांची यादी वाचतातच, शिवाय दादांकडून झालेल्या व्यक्तिगत मदतीचे अनुभव देखील सांगतात. लाटे येथील भेटीत बारामती दूध संघाचे संचालक प्रशांत खलाटे यांनी सांगितलेला अनुभव गलबलून टाकणारा होता. लेकीच्या काळजीने दादांमधील बापाचे काळीज कसे कळवळते ते दाखवून देणारा होता.
असा घडला होता प्रकार…
प्रशांत खलाटे म्हणाले, आमच्या नात्यातील एक मुलगी प्रवरानगर येथे शिक्षण घेत होती. परीक्षेत पेपर अवघड गेल्यामुळे बसलेल्या धक्क्याने ती प्रवरानगर येथून निघून गेली. पाहुण्यांकडून फोन आल्यावर प्रवरानगरला गेलो. सर्व परिस्थिती समजल्यावर आठवले ते दादा. त्यांना लगेच फोन लावला. काळजी करू नकोस, असे सांगत दादांनी तातडीने सर्व यंत्रणा कामाला लावली.
आम्ही सर्व काळजीत होतो. त्या काळजीने प्रवरानगर येथेच थांबलो होतो. पहाटे साडेतीन वाजता दादांचा फोन आला. म्हणाले, प्रशांत पोलिसांनी मुलीला शोधले आहे. ती भुसावळ येथे आहे. पोलिसांना तिची काळजी घ्यायला सांगितले आहे. तुम्ही निघा.
त्या मुलीला दादांनी दिला धीर..
आम्ही लगेच निघालो. दादांचा पुन्हा फोन आला. म्हणाले, पोहोचलास की फोन कर. तिथे गेल्यावर मुलीला भेटल्यावर दादांना फोन केला. दादा म्हणाले, तिच्याकडे फोन दे. दादा तिला म्हणाले, अगं बाळे असं घाबरून कसं चालेल. नापास झालीस तरी चालेल. पण आयुष्य मोलाचे आहे. तुझ्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल हे कळतंय का तुला? घाबरु नको. मी आहे. तुला कोणी काही बोलणार नाही. त्यानंतर दादा माझ्याशी बोलताना म्हणाले, प्रशांत पोरीला काही बोलू नका. तिच्या आई वडिलांना तिची आता पुढेही काळजी राहील. तिला आपल्या बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ दे. दादा हे बोलत असताना अजितदादा नावाचा पहाड दुसऱ्याच्याही लेकीच्या काळजीने गलबलून गेल्याचे जाणवले.
अजितदादा होते रात्रभर जागे
दादांच्या या डोंगराएवढया मदतीने नातेवाईक आणि मी देखील थक्क होऊन गेलो होतो. तेथून निघाल्यावर माझ्या लक्षात आले, की दादा आपल्यासाठी रात्रभर जागेच राहिले. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या मुलीच्या काळजीने रात्रभर पोलिसांच्या संपर्कात राहून, अगदी पहाटे साडे तीन वाजता मला फोन करून, तेव्हापासून सकाळ पर्यंत माझ्याकडून फॉलोअप घेऊन, पुन्हा त्या मुलीशी बोलून, बापाच्या मायेने दादांनी तिची समजूत काढली. दादांचे हे रूप दोन डोळ्यात सामावत नव्हते. एका कर्तबगार नेत्यातील संवेदनशील व्यक्तीचे ते दर्शन होते.
दादांनी असे किती किती, काय काय, कोणा कोणासाठी करून ठेवले आहे. लेकींच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून बोलणाऱ्या, टीका करणाऱ्याना मला एकच सांगायचे आहे, दादा लेकी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कसे आक्रमक होतात ते मीच काय अनेकांनी पाहिले आहे. हा दादा अशी काळजी घेतोच शिवाय विकासाचे भरभरून दान देतो, शेतकरी, महिला, युवती, तमाम जनतेला दिलासा देतो आणि कोणावर एखादा बाका प्रसंग आला तर वाऱ्याच्या वेगाने धावून जातो तो असा.
दादांचा हा आधार आहे म्हणून बारामती सर्वच बाबतीत भक्कम आहे. उगाच कुणी भुलवले, भावनिक केले म्हणून किंवा स्थानिक कुठल्या कुरबुरीवरून हाती असलेलं सोनं गमावू नका. प्रशांत खलाटे यांनी हे सारे सांगितले आणि क्षणभर काय बोलावे ते कळेनासे झाले. कारण, या गोष्टी दादा कधी स्वतःहून सांगत बसत नाहीत. त्यांच्या दृष्टीने अशा गोष्टी त्यांची जबाबदारी असते, कर्तव्य असते. आणखी काय सांगू? असे सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.