
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काल लागला. महायुती व महाविकास आघाडी यासोबतच तिसऱ्या आघाडीनेही निवडणुकीत रंग भरल होता. एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकवत, जनतेने पूर्ण बहुमताने पुन्हा महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले
आता पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण याच्या चर्चा रंगल्या आहेत. कुणी म्हणतं, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. तर कुणी म्हणतं भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. पण भाजपचा धक्कातंत्राचा इतिहास पाहता, यावेळी मुख्यमंत्री करण्याच्या तीन शक्यता आपण पाहणार आहोत…
दिल्लीतून मुंबईला येणार दोन निरीक्षक
सत्तास्थापनेला फक्त ४८ तासांचा अवधी असल्याने, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ निवडीच्या हालचाली शनिवारी रात्रीपासूनच सुरु झाल्या आहेत. महायुतीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. मोठ्या विजयानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, अशा शक्यता वाढल्या आहेत. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून दोन निरीक्षक पाठवले जाणार आहेत. केंद्रीय भाजपकडून दोन निरीक्षक राज्यात येणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
एकनाथ शिंदे गटही झाला अँक्टीव्ह
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही मोठ्या हालचाली घडत आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. यंदा मुख्यमंत्रीपदाचा चेहार एकनाथ शिंदेच असतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजपचे इतर राज्यातील धक्कातंत्र पाहता व महाराष्ट्रातील मागचा अनुभव पाहता, जागा जास्त असूनही ते पुन्हा एकनाथ शिंदे यांना संधी देतील, असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. असे झाल्यास गेल्यावेळीसारखेच दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळतील.
अडीच-अडीच वर्षांचा फाँर्म्यूला ठरेल?
भाजपच्या जागा जास्त आल्या असल्या तरी, भाजपसाठी एकनाथ शिंदेसारखा नेता पहिल्यापासून अनुकूल आहे. अडीच-अडीच वर्षे सत्तेची संधी देण्यााच जुना फाँर्म्यूला ठेवला, तर पहिले अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. पण भाजपच्या जागा पाहता व गेल्यावेळी केलेले उपकार पाहता भाजपला हा फाँर्म्यूला मान्य होईल का, ही शंका आहे. शिवसेनेकडून मात्र अडीच-अडीच वर्षांच्या फाँर्म्यूल्याला ग्रीन सिग्नल मिळू शकतो, असेही सांगितले जात आहे.
दोन-दीड-दीड फाँर्म्यूलाही शक्य
महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला आहे. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागा घेतल्या आहेत. ही सगळी आकडेवारी पाहता अजित पवार गटालाही दुर्लक्षून चालणार नाही. भाजपचे निरीक्षक अजित पवार गटालाही योग्य मानसन्मान देतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यामुळे भाजपला पहिली दोन वर्षे, शिवसेनेला पुढची दीड वर्षे व शेवटची दीड वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करा, अशी मागणीही ऐनवेळी पुढे येऊ शकते. कारण अजित पवार गटानेही अभूतपुर्व यश मिळवत 41 जागा घेतल्या आहेत. मात्र भाजपला हे मान्य होईल का, हा खरा प्रश्न आहे.
दिल्लीतून हालणार सगळी सूत्रे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता वाढली आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. भाजपचे 132 आमदार निवडून आल्याने भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र दिल्लीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेल, हे निर्विवाद सत्य आहे.