
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आज विधानभवनात सर्व नेत्यांनी एकत्र येऊन ही निवड केली. याच वेळी त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देखील पुन्हा देण्यात आली.
उद्या आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकरांचा आनंद गगनात मावेना
या निवडीच्या निमित्ताने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या तीव्र शैलीत भाष्य करत जल्लोष साजरा केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, “महाराष्ट्रातल्या जनतेच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे. 2019 साली जनतेने भाजपला बहुमत दिलं होतं, मात्र त्यावेळी धोका देण्यात आला. पण आता 2024 मध्ये त्यांना त्यांच्या ****** लाथ मारली आहे. आणि आता, तुम्हा सर्वांचा बाप महाराष्ट्राच्या विधिमंडळात आला आहे.”
पडळकरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत ही गटारगंगा आहे. त्यांची वेळ संपली आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे विधानभवनात एकच खळबळ उडाली.
सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
यावेळी सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाचा तारणहार आहेत. त्यांनी शेतकरी आणि गरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. जातीय राजवटीचा पाया शरद पवार यांनी घातला होता, पण आता ती राजवट उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली आहे. आज रामराज्याची सुरुवात होत आहे. आम्ही फडणवीस यांचे शिपाई म्हणून लढत होतो आणि यापुढेही लढत राहू.”
भाजपसाठी नवीन ऊर्जा
देवेंद्र फडणवीस यांची निवड ही भाजपसाठी एक नवा टप्पा मानली जात आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे आणि राजकीय धोरणांमुळे पक्षाला भक्कम आधार मिळाला आहे.