
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळपक्ष नेतृत्वावर नाराज झाले आहेत. भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनातून तडकाफडकी पाय काढत नाशिक गाठले होते.
त्यानंतर आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात भुजबळांनी मनातली खदखद बाहेर काढली. रविवारी, छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांसोबत बैठकही घेतली. त्यानंतर भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले.
मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांच्या बोलण्यातून खदखद व्यक्त झाली आहे. त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात ते आपली पुढील रणनीती जाहीर करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, भुजबळांनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. तर, दुसरीकडे भुजबळांनी अजित पवारांसह पक्षाच्या इतर नेत्यांवरही प्रश्न उपस्थित केले.
छगन भुजबळ यांच्या मेळाव्यात काही पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. तर, दुसरीकडे भुजबळांनी काही मुलाखतीत बोलताना मंत्रिमंडळात स्थान नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले होते, असे सांगितले. एकीकडे फडणवीसांबाबत मवाळ धोरण तर दुसरीकडे अजित पवारांविरोधात कठोर धोरण भुजबळांनी घेतले होते. भुजबळांच्या या धोरणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल….
आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास छगन भुजबळ हे सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ यांच्या जवळपास 20 ते 30 मिनिटे चर्चा झाली. भुजबळांनी भेट कोणत्या कारणांसाठी घेतली, यावर तर्क वितर्क सुरू आहेत. मात्र, भुजबळांनी फडणवीसांच्या भेटीचे टायमिंग साधत अजितदादांवर दबाव आणण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे.
मग, निवडणुकीत संधी तरी का दिली?
मला मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तरुणांना संधी देण्याचा मानस असल्याचे पक्षातून सातत्याने सांगितले जात आहे. मग तरुणांनाच संधी द्यायची होती तर मला उभे कशाला केले? असा थेट सवाल विचारत तरुणांना संधी देताना काही ज्येष्ठ मंत्रीही मंत्रिमंडळात ठेवायचे असतात, असा सल्ला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना दिला. तसेच ओबीसी नेत्यांच्या मतानुसार आणि आग्रहानुसार पुढचा निर्णय लवकरच घेईन, असे सांगून त्यांनी अजित पवार यांचे टेन्शन वाढवले. अजित पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडून भुजबळ यांनी नव्या लढाईला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.