पंचाचा निर्णय तुम्हीच पाहा आणि ठरवा
ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यात भारताची दाणादाण उडवून दिली. दुसऱ्या डावात भारतासमोर विजयासाठी 340 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना टीम इंडियाने 155 धावांवर नांगी टाकली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं समीकरणही बदललं.
खरं तर टीम इंडियाचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, यशस्वी जयस्वालच्या विकेटमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. कारण तिसऱ्या पंचांनी बाद घोषित दिल्यानंतर यशस्वी जयस्वाल चांगलाच संतापला. यशस्वी जयस्वाल एका बाजूने खिंड लढवत होता. त्यामुळे त्याची विकेट ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची होती. खरं तर ऋषभ पंतला जाळ्यात ओढून ऑस्ट्रेलियाने सामना खेचून आणला होता. पण यशस्वी जयस्वाल बाद झाला विजय लवकर आणि सोपा होईल याची जाणीव ऑस्ट्रेलियाला होती. ऑस्ट्रेलियाकडून 71वं षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला होता. त्याने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात चुकला आणि थेट चेंडू विकेटकीपर एलेक्स कॅरीच्या हाती गेला. यावर जोरदार अपील झाली पण पंचांनी नाबाद दिलं.
पंचांनी नाबाद देताच पॅट कमिन्सने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तो आऊट आहे की नाही हे वारंवार तपासलं गेलं. अल्ट्राएजमध्ये कोणतेही स्पाईक आले नाही. पण जेव्हा चेंडू यशस्वी जयस्वालच्या ग्लोव्ह्ज जवळून गेला तेव्हा त्याच्या अँगलमध्ये बदल झाला. पण स्निकोमीटरमध्ये काही रिडिंग दिसली नाही. तरीही यशस्वी जयस्वालला बाद घोषित केलं गेलं. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयामुळे जयस्वालसह भारतीय क्रीडाप्रेमी नाराज दिसले. तिसरे पंच असा निर्णय देतील असं वाटलं नव्हतं. पण निराश होऊन तंबूत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
