मंत्री महाजनांनी मतांसाठी मुस्लिमांना चुचकारलं !
भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमधील जामनेर नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. जामनेर नगरपालिकेत भाजपची संपूर्ण सत्ता येण्यासाठी त्यांनी थेट अंबानीशी असलेल्या संबंधाचा दाखला देत, मुस्लिम मतांना चुचकारलं आहे.
जामनेरमध्ये मुस्लिमांसाठी माझं सगळ्यात जास्त प्राधान्य राहणार असून, शिक्षणासाठी या ठिकाणच्या सर्व शाळा काॅलेज दत्तक घेत आहे,’ अशी घोषणा मंत्री महाजन यांनी केली.
जामनेर नगरपालिकेत 27 उमेदवारांपैकी भाजपचे 1 नगराध्यक्ष व 9 नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. नगराध्यक्ष पद मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan)यांच्या पत्नी साधना महाजनांकडे आले आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र नगरपालिकेत भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 5 जागा मिळवाव्या लागणार आहेत. सध्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत 15 जागांवर लढत होणार आहे.
जामनेर नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता यावी, यासाठी भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी त्यांनी थेट मुस्लिम मतांना चुचकारलं आहे. जामनेर इथं सभा घेत त्यांनी मुस्लिमांना साद घातली आहे. मंत्री महाजन यांच्या या आवाहनाला मुस्लिम (Muslim) मतदार कितपत प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “जामनेरमध्ये मुस्लिम समाज बांधवांसाठी माझं सगळ्यात जास्त प्राधान्य असणार आहे. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी या ठिकाणच्या सर्व शाळा कॉलेजस दत्तक घेतो. मुस्लिम समाज बांधवांसाठी शाळा असेल, महाविद्यालय असेल, याच्यासाठी इमारत बनवायचे असेल, पाच कोटी लागू द्या किंवा दहा कोटी लागू द्या, कुणाकडूनही मागून आणेल.” मी अंबानी यांना पैसे मागेन, त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहे, त्यांना सांगेल की, या ठिकाणी चांगल्या इमारती बांधून द्या, तरी पुष्कळ होईल, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.
‘गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात देवाच्या कृपेने माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुणाला सांगितलं की, दहा कोटी दे, तर तो एका मिनिटात दहा कोटीचा चेक देईल. जामनेर मैं उमेदवार खडे नही बल्की मै खुद खडा हू, यह सोच कर मतदान करे,’ असंही विधान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर इथल्या जाहीर सभेमध्ये केलं.
‘सात वेळा मी आमदार झालो आहे. महाराष्ट्रातला सर्वात सीनियर आमदार मी आहे. असं महाराष्ट्रात कुठे होत नाही. पण तुम्ही करून दाखवलं यात, तुमच्याशिवाय अशक्य होतं. तुमचा मोलाचा वाटा आहे. पुढचे चार वर्षे मी आणखी मंत्री आहे. पाच वर्षांची आपली सरकार आहे. यापुढे पण पक्षाने मला तिकीट दिलं आणि तुम्ही निवडून दिलं, तर परत मंत्री होईल,’ असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.
‘2 तारिक को, किसका मटन नही और किसकी मच्छी नही, सिर्फ कमल का बटन, कमल का बटन दबा के सामनेवाले सभी की डिपॉझिट जप्त करानी है,’ असेही आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
