मराठा समाजाला आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेची मागणी
शासनाने मराठा आरक्षण द्यावे, सगे-सोयऱ्यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे शनिवारपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी या आंदोलनाबाबत माहिती दिली.
”न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार कोणाचेही असले तरी लढत राहणार आहे. शरीर साथ देत नसले तरी उपोषण करण्यावर ठाम आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासोबत दगा फटका करू नये”, असे जरांगे म्हणाले.
देशमुख कुटुंबाला न्याय द्या
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या व खंडणी प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालून दोषींना शिक्षा होण्यासाठी पावले उचलावीत. बीडचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यात लक्ष घालून देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा. बीड जिल्ह्यातील प्रकरणांतील आरोपी वाल्मीक कराड सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे.
त्याला नेमका कोणता आजार आहे, याची चौकशी आरोग्यमंत्र्यांनी करावी. रुग्णालयातील सीसीटीव्ही, फोन कॉल तपासावेत, उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलून आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घ्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.
पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करा
वाल्मीक कराडला सोडण्याचे षड्यंत्र रुग्णालयात रचले जात असेल तर शासनाने चौकशी करून कारवाई करावी. बीडचे पोलिस अधिकारी शीतलकुमार बल्लाळ यांची चौकशी करावी. बीड जिल्ह्यात महादेव मुंडे यांची हत्या झाली आहे. या प्रकरणात कोण दोषी आहे याचा तपास शासनाने करावा. माणुसकीच्या नात्याने आम्ही महादेव मुंडेंच्या कुटुंबासोबत उभे आहोत, असे जरांगे म्हणाले.
वैभवी, धनंजय देशमुखांनी घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी, बंधू धनंजय देशमुख यांनी आज अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेतली. माझ्यासह समाज देशमुख कुटुंबीयांसोबत आहे, असे जरांगे यांनी या दोघांना सांगितले.
