
फडणवीसांचं नाव घेत राज ठाकरेंचा सवाल…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्मजाफीबरोबर राज ठाकरेंनी धोरणात्मक निर्णयावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्याबद्दल केलेल्या भाष्यावरुन राज यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला.
फडणवीस काय म्हणाले होते ?
11 मार्च रोजी भारतीय जनता पार्टीच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा विषयाकडे लक्ष वेधलं होतं. लक्षवेधीमध्ये भोंग्यांचा विषय मांडताना देवयानी फरांदे यांनी, उत्तर प्रदेशातील सर्व भोंगे बंद केले आहेत. राज्यातही तशी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला. स्वपक्षीय आमदाराच्या या प्रश्नावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.दिवसा 55 व रात्री 45 डेसिबलची मर्यादा हवी, असं नियमांमध्ये असल्याचं फडणवीसांनी अधोरेखित केलं. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवलेच पाहिजे. कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देता येणार नाही. निश्चित कालावधीसाठी परवानगी देवू. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणा-यांना परवानगी दिली जाणार नाही. परवानगी आहे की नाही हे तपासण्याची संबंधित पोलीस निरिक्षकांची जबाबदारी असेल. कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मग आम्हाला का नाही जमत ?
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा त्यांच्या पक्षाने उपस्थित केल्याचा उल्लेख भाषणात केला. आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री 10 ते सकाळी 6 लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी 6 ते 10 चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत
राज ठाकरेंनी पुढे बोलताना धर्माच्या आधारावर देश उभा करता येत नाही हे तुर्कीचं उदाहरण देत सांगितलं. “आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं तुर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या तुर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज तुर्कीला पर्यटनासाठी 5 कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल,” असं राज ठाकरे म्हणाले.