
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा बंदी असतानाही देगलूर शहरासह, ग्रामीण भागात गुटखा, मिक्स गुटखा व बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सर्रास सुरू आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिस व अन्न व औषध प्रशासन मेहरबान आहे. त्यामुळे जुजबी कारवाईचे नाटक होत असल्याने पान टपरी व दुकानदार उघडपणे पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटखा विक्री करतानाचे चित्र दिसत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
देगलूर शहर व ग्रामीण भागात असे एकही ठिकाण नाही की जिथे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळत नाही. राज्यात बंदी असल्याने हा गुटखा परराज्यातून मोठ्या प्रमाणात तालुक्यात व जिल्ह्यात आणला जातो अशी चर्चा असून, हा गुटखा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांतून इतर मालाच्या मध्ये भरून आणला जातो. एखाद्या ठिकाणी पोलिस किंवा अन्य कोणी वाहन तपासले तर त्यावेळी वरती गुटख्याच्या ऐवजी दुसराच माल भरलेला आढळतो. पण प्रत्यक्षात वाहनांमध्ये अन्यमालाखाली गुटख्याचा माल लपवला जातो. तळाशी किंवा जिथे दडवण्यासारखी जागा आहे अशा ठिकाणी गुटख्याच्या मालाची पोती असतात. हा गुटखा विशिष्ट ठिकाणी उतरून त्याचे व्यवस्थितपणे वितरण केले जाते. या वितरणाची खास अशी व्यवस्था वितरकाने केली असते. गुटख्याचा माल इच्छित ठिकाणी पोहोचवला जातो.
गुटखा आयात करणारे व विक्री करणाऱ्यांची मोठी साखळी तालुक्यात कार्यरत असून, या साखळीत काम करणाऱ्या व्यावसायिकाला खतपाणी घालणारे अनेक प्रशासनातील शुक्राचार्य आहेत. त्यामुळे मिक्स किंवा अन्य गुटखा विक्री बंद होणार कशी ? असा सवाल सामाजिक संघटना व सुज्ञ नागरिकांच्यातून होत आहे. देगलूर शहर तालुक्यात मिक्स गुटख्यासह बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थाची विक्री
पानटपरीसह किराणा दुकानातून धडाक्यात सुरू आहे. यासाठी पान टपरी व दुकानात गुटखा विक्री करणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये कुठल्यातरी एका कोपऱ्यात गुटख्याच्या पुड्या ठेवल्या जातात आणि जो कोणी दुकानात गुटखा खरेदी साठी येतो तेव्हा त्याला ओळख पटवून द्यावी लागते. प्रसंगी ओळखीचा पुरावा द्यावा लागतो. ओळखीचा असेल तरच त्याला गुटख्याची विक्री केली जाते. अन्यथा नवीन दिसणाऱ्या व्यक्तीला दुकानात सहज गुटखा उपलब्ध होत नाही. पण अलीकडे पोलीस प्रशासन व अन्न प्रशासनाचा वचक न राहिल्याने ग्रामीण व शहरी भागात दुकानात पानपट्टीवर उघडपणे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू आहे.
नव्या नवलाईच्या दिवसापुरती कारवाई…
अवैध गुटखा असो किंवा दारू असो सुरुवातीला जिल्ह्यात किंवा तालुक्यात एखाद्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली की जिल्ह्यात तालुक्यात अवैद्य धंद्यावर कार्यवाहीचा फार्स करून काही दिवस कारवाईचा बडगा उगारला जातो. पण अधिकाऱ्याच्या नवलाईचे नऊ दिवस संपले की पुन्हा सर्वच काही अलबेल असते. असे जिल्ह्यात व तालुक्यात अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र, कायम स्वरुपी तोडगा आजअखेर पर्यंत निघालेला नाही. देगलूर शहर व तालुक्यात गुटखा व मिक्स गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर अनेकदा कार्यवाहीचे नाटक होते. यामुळे चोरून गुटखा विक्री करणारे गुटखा किंमतीत भरीव वाढ करतात. अनेकावर कार्यवाही होवून दंड झाला तरीही पुन्हा मिक्स गुटखा विक्री चोरून केली जाते.
राजरोसपणे गुटखा खाल्ला जातो…
गाडीत किंवा चौकात बंदी असताना उघडपणे तोंडात पुडी टाकत गुटखा चघळत राहतात, तालुक्यात व जिल्ह्यात दररोज वैद्यकीय अवैध पण लाखो रुपयांच्या गुटख्याची आर्थिक उलाढाल होत असते आणि या उलाढालीत काही रकम ही अप्रत्यक्षपणे गुटखा विक्री करणारे व त्याला पाठिंबा देणाऱ्यांना मिळते हे उघड सत्य असल्याची चर्चा तालुक्यात आहे
कारवाईनंतरही गुटखा मिळतो कसा?
देगलूर तालुक्यात अनेकदा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे काही महिन्यापूर्वी कर्नाटक तेलंगाना राज्यातून वाहनातून गुटखा वाहतूक करताना मोठ्या रकमेचा गुटखा जप्त करण्यात आला होता. याशिवाय अन्य ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात कारवाई होते पण कारवाईनंतरही सर्वत्र गुटखा कसा मिळतो? हाही प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.