
राजीनाम्याच्या मागणीवर म्हणाले…
पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. केंद्रातील मोदी सरकारने आता या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
यातच सरकारनं गुरुवारी(ता.25)सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. या बैठकीत दहशतवादाविरोधातील केंद्र सरकारच्या प्रत्येक कारवाईला विरोधकांनी पाठिंबा दर्शवला आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बाजू घेतल्याचं समोर आलं आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करण्यासाठी व पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारवरील दबाव प्रचंड वाढताना दिसून येत आहे. अशातच विरोधी पक्षांतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती.
पण आता राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शाहांच्या (Amit Shah) राजीनाम्यावर प्रश्नावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी पहलगाममध्ये चूक झाल्याचं सांगितलं. आता ज्यांनी भारतावर हल्ला केला,त्यांना शोधून त्यांच्यावर सख्त कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे कुणाला काढा असं मी आज बोलणार नाही, असं म्हणत एकप्रकारे अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावतानाच त्यांची बाजूही घेतल्याचंही समोर आलं. शरद पवार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले,पहलगामध्ये मंगळवारी(ता.22)जो मोठा दहशतवादी हल्ला झाला, त्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.देशभरात संतापाची लाट आहे, या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सरकारनं एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीतसर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली याचा आनंद असल्याची भावना व्यक्त केली.
काश्मीरमध्ये जे झालं,त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व देशवासियांनी एका विचारानं सरकारबरोबर राहिलं पाहिजे.त्यात राजकारण आणायचं नाही.अतिरेक्यांनी भारताविरोधात कारवाई केली,देशविरोधात जेव्हा कारवाई होते, तेव्हा तिथे राजकीय मतभेद ठेवायचे नसतात.माझी विनंती आहे की, जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत, पण सरकारने देखील हे अधिक गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी अपेक्षाही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
शरद पवारांनी यावेळी मोदी सरकारचे कानही टोचले. ते म्हणाले, याआधी आम्ही दहशतवाद संपवला,आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं. पण कुठे ना कुठेतरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे.देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता दूर केली पाहिजे. त्याही कामात आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार असल्याचंही विश्वासही शरद पवारांनी यावेळी दिला.
शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याचा परिणाम निवडणुकांवर होतील, अशी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हा देशावर हल्ला झाला आहे. देशाला आव्हान दिलं आहे. घडलं ते वाईटच आहे. अतिरेक्यांनी यापूर्वी देखील तीन ते चार हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाल्या नाहीत. पण आज धर्माची चर्चा सुरू आहे. ती का होतेय? पण यातून धार्मिक अंतर वाढले, असे काही घडू नये. पण या हल्ल्याचा परिणाम निवडणुकांवर होतील, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.