
व्यापार बंदीने पाकिस्तान महागाईचा आगडोंब उसळला; नेमकं काय घडतंय ?
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतविरोधी पाऊल उचललं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी कठोर भूमिका घेतल्या आहेत.
भारताने सिंधू नदीचं पाणी अडवण्याचा इशारा दिला, तर पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचा प्रत्यक्ष फटका कोणाला बसणार? उत्तर आहे पाकिस्तानलाच!
सिंधू नदीचं पाणी अडवलं तर ‘युद्ध समजलं जाईल’, पाकिस्तानची दर्पोक्ती
सिंधू नदीच्या पाण्यावरून पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतली आहे. “पाणी अडवलं, म्हणजे युद्ध छेडलं”, अशी गर्जना पाकिस्तानकडून करण्यात आली. पण त्याचवेळी त्यांनी भारतासोबतचा संपूर्ण व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
3838 कोटींचा व्यापार ठप्प, पाकिस्तानवर महाभार
वाघा बॉर्डरद्वारे दरवर्षी भारत-पाकिस्तान यांच्यात सुमारे 3838.53 कोटी रुपयांचा व्यापार होतो. यात भारताच्या अफगाणिस्तानमार्गे होणाऱ्या व्यापाराचाही समावेश आहे. आता या सर्व व्यवहारांना पूर्णविराम लागणार आहे. परिणामी, आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
भारतावर अवलंबून असलेल्या गोष्टींची साखळी खंडित
पाकिस्तान भारताकडून औषधे, केमिकल्स, फळं, भाज्या, पोल्ट्री फीड यांसारख्या आवश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर आयात करतो. औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या बाबतीत पाकिस्तान 30 ते 40 टक्के भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे या व्यापार बंदीमुळे औषधांचे दर आकाशाला भिडण्याची शक्यता आहे.
महागाईच्या खाईत पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये सध्या महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत:
चिकन (1kg): ₹798.89
दूध (1 लिटर): ₹224
ब्रेड (½ किलो): ₹161.28
अंडी (1 डझन): ₹332
केळी (1 किलो): ₹176
टोमॅटो (1 किलो): ₹150
तांदूळ (1 किलो): ₹339.56
या परिस्थितीत भारतासोबतचा व्यापार बंद करणं म्हणजे आर्थिक आत्महत्येच्या दिशेने टाकलेलं पाऊलच म्हणावं लागेल.
व्यापार बंदीचं मोठं नुकसान, परतवाट पाकिस्तानलाच
पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताला काही प्रमाणात परिणाम होणार असला, तरी दीर्घकाळात याचे सर्वाधिक दुष्परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, महागाईचा स्फोट, आणि औषधांपासून इतर अत्यावश्यक गोष्टींच्या किमती वाढणं हे सर्व पाकिस्तानी जनतेला अधिकच त्रस्त करणार आहेत.