
वाढदिवस साजरा न करता पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत…
मुंबई जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांनी प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेनंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी वाढदिवस साजरा केला नाही.
सोमवारी (२८ एप्रिल) त्यांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ निरपराध नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ही हृदयविदारक घटना मनाला चटका लावून गेली. त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेत सहभागी होण्यासाठी, स्वतःचा वाढदिवस न साजरा करता, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला रु. १५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी लोकमतला सांगितले.
मुख्यमंत्र्यांना प्रसाद लाड यांचे पत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांनी शहीद (त्यांनी या मृत नागरिकांना ‘शहीद’ असेच संबोधले आहे) झालेल्या ६ नागरिकांच्या कुटुंबियांना या निधीतून प्रत्येकी २.५० लाख रुपयांची मदत दिली जावी अशी विनंती केली. सदर मदतीचा हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
या शहिदांच्या त्यागाला वंदन करीत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याचा हा माझा नम्र प्रयत्न आहे,” अशी भावना त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आज त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना दिलासा मिळावा, ही इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.