
CM फडणवीसांच्या हस्ते कॅबिनेट हॉलमध्ये सोहळा संपन्न…
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8 आणि 9 ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉ प्रदीप आगलावे, सदस्य योगीराज बागुल, ज.वि. पवार, डॉ. संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
‘जनता’ हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1930 ते 1956 पर्यंत प्रकाशित झाले होते. ‘जनता’ हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे 6 खंड प्रकाशित केले आहेत.
खंडांमध्ये काय असणार?
‘जनता’ खंड 7- या खंडात 12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे.
‘जनता’ खंड 8- या खंडात 4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे.
‘जनता’ खंड 9- या खंडात 3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे.
माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरण्यासाठी वृत्तपत्रांची निर्मिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती. त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरले.
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.