
अजित पवारांनी दिलं होतं पाठबळ; दोन्ही व्हिडीओ व्हायरल…
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुळशीच्या भुकूम येथील हगवणे कुटुंबाने आपल्या दोन्ही सुनांचा कसा छळ केला होता, हे आता पुढे येत आहे.
या छळाला कंटाळूनच वैष्णीवीने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
वैष्णवीचा पती शशांक, दीर सुशील, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवाय या कुटुंबाशी सलगी असणारा निलेश चव्हाण याच्यावही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हिचादेखील यांनी छळ केला होता. त्यामुळे ती कुटुंबापासून वेगळी राहाते.
राजेंद्र हगवणे आणि हगवणे कुटुंबियांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. याच हगवणे कुटुंबियांनी एप्रिल २०२३ मध्ये चक्क बैलासमोर गौतमी पाटील या नृत्यांगणेला नाचवलं होतं. तेव्हा त्यांची खूपच चर्चा झाली होती. या प्रकरणावर अजित पवारांना उत्तर द्यावं लागलं होतं.
बैलासमोर नाचली गौतमी
मुळशी तालुक्यातील भुकूम हे राजेंद्र हगवणे यांचं गाव. याच गावात एप्रिल २०२३ मध्ये गौतमी पाटलाच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या बैलाचं नाव होतं बावऱ्या. राजेंद्र हगवणेंचा मोठा मुलगा सुशील हगवणे याच्या नावाने असलेल्या सुशील हगवणे युवा मंचच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, त्या दिवशी गौतमीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकच नव्हते. तिला आपली कला बैलासमोर सादर करावी लागली होती. गौतमीला तास-दोन तास बैलसमोर नाचवल्याने हे प्रकरण मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये झळकलं. हगवणे यांनी हळदीच्या कार्यक्रमासाठी गौतमीला सुपारी दिली होती. या बैलाचं बावऱ्या नावही त्यावेळी भलतंच गाजलं होतं.
अजित पवारांना विचारला होता प्रश्न
हगवणे कुटुंब हे अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी होते. त्यामुळे गौतमीला बैलासमोर नाचवल्याचं प्रकरण त्यांच्यापर्यंत गेलं. त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले होते की, ”तुला काय वाईट वाटलं.. ती बैलासमोर नाचेल नहीतर आणखी कोणासमोर नाचेल.. तुला का त्रास होतोय?” असं म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे हगवणेंना पाठबळच दिलं होतं.
अजित पवार पुढे म्हणाले होते की, बैलच काय गायीसमोर नाचू देत.. तो तिचा अधिकार आहे. गौतमीचा हा व्यवसाय आहे. लहान मुलांचं बारसं असतं, त्याला अजून कळतही नाही. तरीही बारशाच्या निमित्ताने गौतमीला बोलावलं जातं.. तिला नाचावंच लागतं. बैलपोळा असो की बैलगाडा शर्यत कला सादर करणं हे तिचं काम आहे, असं ते शेवटी म्हणाले होते.