
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकत्रीकरणाच्या तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे त्या-त्या पक्षातील काही नेत्यांनीही ही युती आणि पक्षांचे एकत्रीकरण व्हावे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे.
असे असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाचे नेत तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही दोन्ही पवारांनी एकत्र यावं, असं थेट भाष्य केलं आहे.
हर्षवर्धन पाटील हे शर्डीमध्ये साई समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही भाष्य केलं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं
ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या मनसेची तसेच ठाकरे गटाच्या युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, ही युती होऊ शकते, असं जाहीरपणे पुन्हा एकदा बोलून दाखवलंय. हाच धागा पकडत राजकारणात मतभेद असतात मात्र मनभेद नसतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांचा तसेच शरद पवार यांच्या पक्षाच्या एकत्रीकरणावरही भाष्य केलं. दोन्ही पवारांनीही एकत्र यावं असं मला वाटतं. त्यांच्यातील मतभेद दूर व्हावेत. व्यक्तिगत अडचणींपेक्षा राज्य महत्त्वाचे आहे, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच प्रत्येकवेळी राजकारण बघून चालत नाही. राज्याच्या हितासाठी दोन्ही पवार एकत्र आले तर स्वागतच आहे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
नेमकं काय होणार ?
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, असं बोललं जात आहे. तशी अपेक्षाही पवार घराण्यातील आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या बड्या नेत्यांनीदेखील अशाच प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. तसेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरही चर्चा चालू झाली आहे. त्यामुळे आता भविष्यकालीन राजकारण लक्षात घेता नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.