भाजप नेत्याचा खळबळजनक दावा…
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनातन धर्म, इस्लाम आणि भारतातील सांस्कृतिक वारसा यांच्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक संबंधांवर अत्यंत वादग्रस्त आणि लक्षवेधी दावे केले आहेत.
सर्व मुस्लीम हे प्रभू रामाचेच वंशज असून राम आणि कृष्णाला न मानणारे खरे मुस्लीम नाहीत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. India Today ला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मातील प्रभू राम आणि कृष्ण यांना इस्लाममधील संभाव्य पैगंबर म्हणून संबोधले आहे.
सनातन धर्म इस्लामपूर्व काळापासून आहे
सिद्दीकी म्हणाले, “सनातन धर्म इस्लामच्या खूप आधी अस्तित्वात होता. तोच आपल्या संस्कृतीचा पाया आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीची मुळे याच हिंदू धर्मात आहेत.
इस्लामी परंपरेचा हवाला देत सिद्दीकी म्हणाले की, कुरानमध्ये फक्त 25 पैगंबरांची नावे आहेत, परंतु हदीस आणि अन्य इस्लामी परंपरांनुसार एकूण 1,24,000 पैगंबर जगात वेगवेगळ्या काळात पाठवले गेले होते.
जगभरातील अनेक पैगंबरांची नावे आपल्याला माहित नाहीत. मग प्रभू राम आणि प्रभू कृष्ण हे त्यात का नसावेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी असा दावा केला की प्रभू राम आणि कृष्ण हे देखील ईश्वराचे संदेशवाहक (पैगंबर) असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राम व कृष्ण मानत नाहीत ते खरे मुस्लीम नाहीत
सिद्दिकी म्हणाले, जे मुस्लिम राम आणि कृष्णांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना खरे मुस्लिम म्हणता येणार नाही. भारतातील मुस्लीमांचा वारसा आणि मूळ भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेले आहे.
सिद्दीकी यांनी आणखी एक लक्षवेधी दावा करत सांगितले की, “सर्व मुस्लीम हे प्रभू रामांचे वंशज आहेत.” त्यांचा यामागचा युक्तिवाद असा आहे की भारतीय मुस्लिमांचा उगम हाच प्राचीन भारतीय परंपरेशी निगडित आहे. “पद्धती बदलल्या असतील, पण आपली संस्कृती आणि ओळख अजूनही सनातनी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय व धार्मिक वर्तुळात चर्चा
सिद्दीकी यांच्या या विधानामुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका मुस्लिम नेत्याने हिंदू देवतांना इस्लामी परंपरेत स्थान देण्याचा केलेला हा प्रयत्न अनेकांसाठी धक्कादायक तर अनेकांसाठी विचार करायला लावणारा आहे.
सिद्दिकी यांची यापुर्वीची गाजलेली वक्तव्ये
दरम्यान, जमाल सिद्दीकी यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात यापुर्वीही चर्चा झाली आहे. एकीकडे त्यांना पाठिंबा मिळाला तर दुसरीकडे टीकाही झाली आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये छत्तीसगडमधील रायपूर येथे असदुद्दीन ओवैसी हे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा दुसरा प्रकार आहेत, अशी टीका केली होती.
जून 2023 मध्ये सहारनपूर येथे सिद्दीकी यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर टीका करत मुस्लिम समाज या युनिफॉर्म सिव्हिल कोड कायद्याच्या विरोधात नाही, उलट तो स्वीकारण्यास तयार आहे, असे ते म्हटले होते.
ऑक्टोबर 2023 मध्ये राजस्थानमधील कोटा येथे सिद्दीकी यांनी काँग्रेसने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुन्हा राष्ट्रपती बनवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती बनवले, अशी टीका केली होती.


