
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम:-शिक्षण क्षेत्रात भूम शहराचे नाव उज्ज्वल करणारा विद्यार्थी आदिल शेख याने JEE Mains परीक्षेत ९८.९९ टक्के आणि महाराष्ट्र सीईटीमध्ये ९८.८४ टक्के गुण मिळवत थेट IIT जम्मू-काश्मीर येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल एस.टी. महामंडळ भूम आगारात कार्यरत असलेले कर्मचारी अब्दुल शेख यांचे सुपुत्र आदिल शेख याचा मा.नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सत्कार समारंभात नगराध्यक्ष गाढवे यांनी सांगितले, “गावातील सामान्य कुटुंबातील मुलगा परिश्रम व जिद्दीच्या जोरावर आयआयटीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत पोहोचतो, तेव्हा तो फक्त आपल्या कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा आणि भूम तालुक्याचा अभिमान बनतो.”
यावेळी शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन आदिलचा सत्कार करण्यात आला. त्याच्या यशामागील कष्ट, सातत्य आणि घरातील पोषण यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाला जाकीर शेख, राम बागडे, पत्रकार अब्बास सय्यद यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देताना उपस्थितांनी एकमताने म्हटले की, “आदिलसारख्या विद्यार्थ्यांनी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे अशी अपेक्षा आहे.”