
हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल !
मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कर्मचाऱ्यांनी मारलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर मराठी भाषेच्याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकत्र आले.
त्यांनी विजयी मेळावा घेतला. आता याप्रकरणी सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्तानी भाऊ’ने एक व्हिडीओ पोस्ट करत राज ठाकरे आणि मनसैनिकांना विनंती केली आहे. मराठी भाषेवरून आपल्याच हिंदू लोकांना मारणं चुकीचं असल्याचं त्याने म्हटलंय.
काय म्हणाल हिंदुस्तानी भाऊ?
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे गर्वच नाही तर माज आहे. परंतु मराठी भाषेवरून इथं आलेल्या हिंदुस्तानमधल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे. शाळा असो किंवा कॉलेज.. तिथे मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची आहे, ती लावा. पूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण साहेब, गोरगरिबांना मारणं चुकीचं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक दुसऱ्या राज्यात शिकायला, नोकरी करायला गेले आहेत. तिथली लोकंही बघतात की आपल्या लोकांना मारलं जातंय. जर त्या लोकांनी तिथे मराठी लोकांसोबत असं केलं, तर आपण काय करणार? एखाद्याला मारणं खूप सोपं असतं, पण एकत्र आणणं खूप अवघड असतं, असं तो म्हणाला.
या व्हिडीओमध्ये त्याने पुढे राज ठाकरेआणि मनसैनिकांना विनंती करत म्हटलंय, “बाळासाहेबांनंतर त्यांची एक सावली म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही हिंदुत्वासाठी बोला. प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. पण गोरगरीबांना मारून, त्यांना जबरदस्ती करून.. तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करताय. ते पण हिंदूच आहेत. तुमच्यापासून ते लोक लांब जात आहेत. राजकारण करा पण आज तुम्हा राजकारण कोणासोबत करताय? ज्या लोकांनी बाळासाहेबांचा सन्मान नाही केला, काँग्रेससोबत जाणाऱ्यांशी तुम्ही आज युती करून बसला आहात. जे श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले, त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार का? हिंदू समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेनं बघतोय, त्यांचा विश्वास तोडू नका. संपलेला पक्ष असं तुम्हाला ते बोलले. मी मनसैनिकांनाही विनंती करतो की, तेसुद्धा हिंदू आहेत, त्यांना नका मारू. आपल्या लोकांना मारू नका.