
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
उदगीर (प्रतिनिधी): सरकारी कार्यालयातील कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयाचे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनःपूर्वक स्वागत करत शासनाचे अभिनंदन केले आहे.
या परिपत्रकानुसार, आता कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत स्वतःचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणतेही वैयक्तिक कार्यक्रम साजरे करता येणार नाहीत. तसेच तासन्तास फोनवर बोलणे, वारंवार बाहेर जाणे, मित्रांशी गप्पा मारणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“सरकारी काम सहा महिने थांब” या मानसिकतेला आता आळा बसणार!
—
या निर्णयामुळे सरकारी कार्यालयात कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. सर्वसामान्य जनतेला वेळ वाया घालवावा लागणार नाही, तसेच कार्यालयीन वेळेचा गैरवापर टळेल. शासनाने घेतलेला हा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे आणि समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे.
________________________________________
बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे लोकांच्या अडलेल्या कामांना गती मिळणार आहे. मात्र हा निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अमलात आला पाहिजे, यासाठी प्रशासनाने देखील कटिबद्ध असले पाहिजे.”
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, सरकारी यंत्रणांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकाभिमुख दृष्टिकोन वाढीस लागल्यासच खऱ्या अर्थाने बदल घडून येईल. बहुजन विकास अभियानाच्या वतीने शासनाच्या या पावलाचे मनापासून स्वागत करण्यात आले असून, सर्व नागरिकांनीही या बदलाला पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.