
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी विधानसभेत विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना घरकुल लाभ मिळण्यासंदर्भात सवाल उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली.
घरकुल योजनेसाठी नव्याने सुरू झालेल्या सर्वेक्षणामध्ये सर्व पात्र नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात सांगितले आहे.
पंतप्रधान आवास योजना आणि इतर घरकुल योजनांच्या माध्यमातून यंदा महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 30 लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील 7 वर्षांत 13 लाख घरे बांधली गेली असताना, एकाच वर्षात एवढा मोठा टप्पा गाठणे हे अभूतपूर्व आहे. या 30 लाख घरांपैकी 20 लाखांहून अधिक प्रकरणांचे वितरण पूर्ण झाले आहे. ग्रामविकास विभागाने एकाच महिन्यात १५ लाख प्रकरणांना मंजुरी दिली आणि 10 लाख लोकांना प्रथम हप्त्याचा निधी वितरित केला आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “पंतप्रधान आवास योजनेतील प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने नव्याने सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ज्यांची नावे यापूर्वी सुटली होती, त्यांनी आवर्जून नव्याने नोंदणी करावी. महसूल, ग्रामविकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन घरकुलासाठी रेती उपलब्ध होत आहे का नाही याचा आढावा घेतला जाईल. यावर्षी मंजूर झालेली घरे ही सर्व सौरऊर्जेवर आधारित असणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 हजार रुपये अतिरिक्त दिले जात आहेत, जेणेकरून विजेचे बिल लागणार नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील खंडी-नैनवाडी या भागात मागेल त्याला वीजपुरवठा देण्यात आला आहे. आदिवासी भागातील विकासकामांसाठी आवश्यक निधी दिला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी भामरागड येथील वीज पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गडचिरोलीतील कातकरी, कोलम अशा प्रीमिटिव्ह आदिवासी भागात व्यक्तिगतरित्या वीज जोडणी देण्याचे काम सुरू असून, ज्यांनी अर्ज केला त्यांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरुवातीला 271 वीज जोडण्याची गरज होती. मात्र प्रत्यक्षात 671 जोडणी दिली गेली. भामरागडमध्ये देखील 65 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. अगदी दोन-तीन व्यक्ती राहणाऱ्या पाड्यांपर्यंतही वीज पोहोचवण्यात आली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.