
ठाकरेंच्या सेनेचा दावा; एकप्रकारे हे निरोपाचे…
पंतप्रधान मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. पंतप्रधान म्हणून त्यांचे हे बारावे भाषण होते. या वेळी त्यांचे मन अस्थिर व चिंताग्रस्त होते.
वरवरचे अवसान आणून ते बोलत होते. तेरावे भाषण करायला आपण पुन्हा लाल किल्ल्यावर येऊ काय याबाबत त्यांच्या मनात शंका असाव्यात व ती अस्वस्थता, भय त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. “स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य दिन, लाल किल्ला या सगळ्यांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काडीमात्र संबंध नाही. तरीही पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात संघाची जोरदार खुशामतखोरी केली ती याच भयातून,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा वापर संघाच्या चमचेगिरीसाठी
मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वपूर्ण भाषणात संघाचे लांगूलचालन करण्याचे कारण नव्हते. मोदी यांनी संघाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संघ जगातील सर्वात मोठी ‘एनजीओ’ आहे, अशा शब्दांत मोदी यांनी गौरव केला. प्रश्न इतकाच आहे की, जगातील या एनजीओने भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाची निवड आतापर्यंत का रोखून ठेवली? दुसरे म्हणजे या ‘एनजीओ’ने सत्तापदावरील व्यक्तीने 75 व्या वर्षी निवृत्ती पत्करून सामाजिक कामात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत ते कोणासाठी?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. “देशाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार, या एनजीओने मोदी यांना 75 व्या वर्षी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले व त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा वापर संघाच्या चमचेगिरीसाठी केला,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
लाल किल्ल्यावरून खऱ्या हुतात्म्यांचा व क्रांतिकारकांचा अपमान
व्यक्तीनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे, असे मोदी म्हणाले; पण स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास वेगळीच माहिती देतो. एक तर स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतरच्या राष्ट्रनिर्माणात मोदी यांचा पक्ष व संघ कोठेच दिसत नाही. स्वातंत्र्य लढ्यात लक्षावधी सामान्य नागरिक, काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जीवनाचा अंत करून घेतला, हौतात्म्य पत्करले. त्यात समाजवादी, डाव्या विचारसरणीचे असंख्य लोक होते. मोदी यांनी मात्र राष्ट्रनिर्माणाचे श्रेय संघ स्वयंसेवकांना देऊन लाल किल्ल्यावरून खऱ्या हुतात्म्यांचा व क्रांतिकारकांचा अपमान केला. हे संघाच्या नेत्यांनाही आवडले नसेल,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
…म्हणून लाल किल्ल्यावरून आटापिटा
संघाला शंभर वर्षे झाली, पण स्वातंत्र्य चळवळीतला काँग्रेस पक्ष दीडशे वर्षांचा आहे. मोदी लाल किल्ल्यावरून ‘संघ चालिसा’चे पठण व मनन करीत आहेत. कारण मोदींचे पंतप्रधानपद हे सरसंघचालक मोहन भागवतांच्या कृपेवर टिकून आहे. संघाची दया आणि भागवतांची कृपा राहावी यासाठी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आटापिटा केला. मोदी यांचे लाल किल्ल्यावरील भाषण समोर बसलेल्यांचा अंत पाहणारे होते. ते पावणेदोन तासांपेक्षा जास्त बोलत राहिले. कारण त्यांच्यासमोर टेलिप्रॉम्टर होता,” असा शाब्दिक चिमटा ठाकरेंच्या शिवसेनेनं काढला आहे.
निरोपाचे भाषणच
“जनतेने वृत्तवाहिन्यांवर किंवा टीव्हीवर इतके लांबवलेले, कंटाळवाणे भाषण ऐकले असेल काय, याबाबत शंका आहे. एकप्रकारे हे निरोपाचे भाषणच होते. जाता जाता ‘संघा’ची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला, इतकेच, असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.