
लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा अर्थव सुदामेला फुल्ल सपोर्ट; पोस्ट चर्चेत !
गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवण्यासाठी अथर्व सुदामेनं एक रील व्हिडिओ शेअर केला होता. यात मूर्तीकार हा मुस्लिम असल्यानं अनेकांनी आक्षेप घेतला, हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत त्याला धमक्याही दिल्या.
यानंतर त्यानं हा व्हिडिओ डिलिट केला आहे. यावर आता अभिनेता अभिजीत केळकर यानंही पोस्ट शेअर करत मत व्यक्त केलंय. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा संदेश आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा? असं त्यानं म्हटलंय.
काय आहे अभिजीत केळकरची पोस्ट?
माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम… युद्धात देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, संरक्षणाची जबाबदारी सक्षमतेने पार पडणाऱ्या सोफिया कुरेशी, सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबलानवाज उस्ताद अल्लारखा खान, झाकीर हुसेन, A R रेहमान, सानिया मिर्झा, तिन्ही खान, रफी साहेब, युसूफ खान, मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी आणि असे अनंत… ह्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, अभिमान असेल आणि त्यांच्यावर प्रेम करताना त्यांचा धर्म कुठला हा विचार आपल्या मनातही येत नसेल.
मला गरज पडली तर माझ्यासाठी ज्याने रक्तदान केलं, डॉक्टर म्हणून उपचार केले, जेवताना ते धान्य ज्याने पिकवलं तो कुठल्या धर्माचा, जातीचा आहे हे मला विचारावंसं ही वाटत नसेल तर मग आपण जिला बुद्धीची देवता मानतो अशा गणपती बाप्पाची मूर्ती कोणी घडवली आहे, त्या माणसाची जात, धर्म कुठला आहे ह्याचा मला का फरक पडावा?
मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात माझं काहीही कर्तृत्व नाही, ना माझ्या आई वडिलांनी जात पात मानण्याचे संस्कार माझ्यावर केले. सरकारी ठिकाणी, कागदपत्रांवर जात, धर्म लिहावा लागतो म्हणून नाईलाजाने मी तो लिहितो / लिहावा लागतो… जन्माने मिळालेला माझा हिंदू धर्म, जन्माने मला मिळालेली ब्राह्मण ही माझी जात, मला कुठलाही भेदभाव किंवा द्वेष करायला शिकवत नाही… उलट माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम हीच शिकवण देतो… हे असं असताना जर अथर्व सुदामे हाच संदेश आपल्या व्हिडिओतून देत असेल तर तो आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा ?
असं अभिजीत केळकर यानं म्हटलंय.