
अजित पवारांच्या ‘त्या’ प्रकरणावर विरोधकांची सडकून टीका…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर राज्यभरात हे प्रकरण चर्चेत आले आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, महिला अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती.
यानंतर विरोधकांनी मात्र, अजित पवारांवर चांगलीच टीका केली आहे.
तर सत्ताधारी पक्षाकडून त्यांची पाठराखण केली जात असून माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्ताधारी पक्षातील सर्वांनाच सत्तेचा माज आलाय अशा शब्दात टीका केली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावरील कारवाई थांबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दूरध्वनी करून आदेश दिल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी सारवासारव केली. यासंदर्भात आपल्याला कार्यकर्त्यांनी दूरध्वनी केल्याने परिस्थिती बिघडू नये, यादृष्टीने दूरध्वनी केल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी केले.
हेही वाचामुख्यमंत्री महोदय आम्ही पण येणार मुंबईत, तीन महिन्यापासून उपासमार म्हणून गाठणार आझाद मैदान…
काय म्हणाले वडेट्टीवार?
अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे काम करू न देणे, त्यांना धमकावणे हा प्रकार हुकूमशाहीचा आहे. सत्ताधारी पक्ष लोकशाहीला मानत नाही. हे यातून दिसून येत आहे. वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करू असा अहमपना सत्ताधारी पक्षात आलेला आहे. हा सत्तेचा माज आहे. अशाप्रकारे राज्याचा कारभार चालवला जात नाही असेही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या प्रकरणावर सारवासारव केली. अजित दादा कुठलेही चुकीचे काम करणार नाही. जनतेच्या कामांसाठीच त्यांना हे पाऊल उचलावे लागले असेही ते म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही.
तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे ॲक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.