
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा.दवणे
जालना
(परतूर )
अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, बाजरी व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात हताशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी यदलापूर व बदलापूर येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.
गुडघाभर पाणी साचलेली शेतं, पाच फुटापर्यंत पाण्याखाली गेलेली उभी पिकं या हृदयद्रावक दृश्यांची पाहणी करताना आमदार भावूक झाले. शेतकऱ्यांनी “आता जगायचं कसं?” असा प्रश्न विचारताच लोणीकरांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”
“संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कुणीही धीर सोडू नका, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन आमदारांनी दिले.
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
“कालच अतिवृष्टी झाली आणि आज लगेच आमदार आमच्या बांधावर आले. मदतीचे आश्वासन दिल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना शेतकरी गजानन चवडे यांनी व्यक्त केली.
उपस्थित मान्यवर या पाहणी दौऱ्यात उपसभापती संभाजी वारे, तहसीलदार प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी तांगडे, सरपंच व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते