
महसूल मंत्र्यांनी जे सांगितले त्यानंतर राज्यात…
राज्यात २० नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा तसेच ८१ नवीन तालुके आणि तहसील कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे. २०२१ ची जनगणना, भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतरच जिथे गरज आहे तिथे जिल्हा व तालुक्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वाधिक चार पट अधिक वाळू तस्करी सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तेव्हा वाळू तस्करांचे कंबरडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी मोडून काढावे, असे निर्देश त्यांनी दिले.
बावनकुळेंनी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे व जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत बावनकुळे म्हणाले, विविध लोकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वाधिक वाळू तस्करी होत असल्याची तक्रार आहे. ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे, त्याने दररोज किमान तीन हजार ट्रक वाळू तस्करी होते असे नमूद केले आहे.
तीन हजार ट्रक नसेल पण तीनशे ,चारशे ट्रक वाळू तस्करी होत आहे. तेथील वाळू घाटावर कॅमेरे नाही, तेथील ट्रकची नोंदणी होत नाही. मात्र आता आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे संपूर्ण अधिकार दिले आहेत. अशा वाळू तस्करांचे कंबरडे जिल्हाधिकाऱ्यांनी मोडावे असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. जिल्ह्यात वाळू तस्करीचे सर्वपक्षीय सिंडीकेट असल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता सर्व रेती तस्करांवर एमपीडीए कायद्यांन्वये कारवाई करावी असेही सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचा दबाव असतो, तिसऱ्या राजकीय व्यक्तींचा दबाव ऐकण्याचे काहीही कारण नाही असेही बावनकुळे म्हणाले.
जिल्ह्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन होत नाही ही बाब निर्देशनास आणून दिली असता सदर मुद्दा आजच्याच बैठकीत निकाली काढतो असेही बावनकुळे यांनी सांगितले. आदिवासींच्या जमिनींबाबत फसवणूक होऊ नये यासाठीच आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर देण्यासंदर्भात कायदा करित असल्याचे सांगितले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिवती येथील ८ हजार हेक्टर वन जमीन वगळण्याचा निर्णय आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे घेण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
आमदार पडळकर यांना समज दिली
भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही आपल्या संस्कार, संस्कृतीला पटणारी नाही. अशा प्रकारचे वक्तव्य कुणाबद्दलही करू नये. आमदार पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासह मी स्वत: सूचना दिल्या आहेत. यानंतर ते असे वक्तव्य करणार नाही. जे काही झाले ते चुकीचे आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती राहणार आहे. निवडणुका लागल्याशिवाय तिकीट वाटपाचे धोरण ठरत नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच या सर्व गोष्टी होतात, असेही बावनकुळे म्हणाले.